महाराष्ट्रामध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर अनेक पक्षप्रवेश होत असून महायुतीमध्ये अंतर्गत पक्षप्रवेशावरून वाद निर्माण झाला असल्याचे समोर आले आहे.
यावेळी काही दिवसांपासून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत आणि भाजपमध्ये नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे. अशामध्ये नुकतेच बुधवारी (19 नोव्हेंबर) एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली. यावर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील निशाणा साधला आहे. “एक कुणीतरी गेलंय बाबा मला मारले म्हणून दिल्लीला. ही लाचारी का?” असे म्हणत टीका केली आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेकडून गुरुवारी (20 नोव्हेंबर) डिजिटल बोर्डचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, “आयुष्यात चांगले शिक्षक आणि चांगले शिक्षण मिळाले नाही तर काय होते? हे आपण पाहतो. दिवटी म्हणजे मशाल आणि दिवटा म्हणजे… त्यामुळे असे जे काही दिवटे निघाक्ले आहेत, त्यांना मशालीचे महत्त्व कळणार नाही आणि कळणारही नाही. ही मराठी भाषेची गंमत आहे.” असे म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला. भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले की, “मी पण आमदार आहे. सगळे आमदार, खासदार आपला फंड वापरतात. पण हा फंड विरोधी पक्षाच्या आमदार, खासदारांना देताना हात आखडता घेतला जातो. त्यांच्या आर्थिक नाड्या आवळल्या जातात. हे सर्व आपण बातम्यांमध्ये वाचतो. पण आता कहर म्हणजे, त्यांच्यातच एकमेकांच्या नसा आळण्याचे काम सुरू झाले आहे. असे म्हणत त्यांनी महायुतीला टोला लगावला.
एक कुणीतरी गेले आहे, बाबा मला मारले म्हणून दिल्लीला. ही लाचारी का? तर तेच की, त्या वयात चांगले शिक्षक मिळाले असते तर ही वेळ आलीच नसती. असे म्हणत त्यांनी अमित शहा आणि एकनाथ शिंदे भेटीवर भाष्य केले. “शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या आजोबांना (प्रबोधनकार ठाकरे) दोघांनाही शालेय शिक्षण पूर्ण करता आले नाही. दोघांनाही इयत्ता सातवीत फी भरण्यास पैसे नाहीत म्हणून शाळा सोडावी लागली. पण शाळा सुटली तरी त्यांचे शिक्षण थांबले नाही. कारण, घरामध्ये संस्कार नावाचा एक विषय असतो. आपण मुलांना संस्कारित करतो. आई-वडिल आपल्या मुलांना स्वतःच्या वागणुकीतून मुलांना संस्कार देतात. आपण जसे वागतो, तशी आपली मुले वागत असतात. आणि मग घराणेशाही म्हणजे तशीच म्हणजे वडिलांनी एवढा घोटाळा की, मुलगा आणखी मोठा घोटाळा करणार आहे. या सर्व गोष्टी संस्कारातून येतात. असे ते पुढे म्हणाले…


