फडणवीस; चव्हाणांना ऑपरेशन लोटस ची स्ट्रॅटेजी बदलावी लागणार…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपमध्ये सुरु असलेल्या मेगाभरतीला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्यात झालेल्या भाजप प्रवेशावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन हा ब्रेक मारायला लावला आहे.
मागील आठवड्यात अजित पवारही दिल्ली दौऱ्यावर होते. तेव्हा त्यांनीही याबाबत शाह यांच्यासोबत या विषयावर चर्चा केली असल्याची माहिती आहे. त्यामुळे सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादी डॅमेज करून किंवा हे पक्ष अस्वस्थ होतील असे पक्षप्रवेश टाळले जाण्याची शक्यता आहे.
भाजपमध्ये सध्या येईल त्याला पक्षप्रवेश ही सूत्र अवलंबले असल्याचे दिसून येत आहे. शिवाय मित्रपक्षांविरोधातही प्रत्येक ठिकाणी पर्याय उभा करण्यावर भर दिला जात आहे. यातूनच मंत्री दादा भुसे, शंभुराज देसाई, संजय शिरसाट यांच्याविरोधात लढलेल्या नेत्यांना भाजपने पायघड्या टाकल्या. त्यानंतर भाजपने थेट एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातच हात घातला. ठाण्यात काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांचा भाजप प्रवेश झाला. खरंतर त्यांच्यासाठी आधी शिवसेनेने गळ टाकला होता. पण प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी म्हात्रेंना भाजपकडे वळवले.
त्यापाठोपाठ वामन म्हात्रे यांचे चिरंजीव अनमोल म्हात्रे आणि शिवसेनेच्या इतर ३ माजी नगरसेवकांना भाजपमध्ये घेतले. यावरून शिंदेंची चांगलीच चिडचिड झाली. शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रालयात उपस्थित असूनही थेट कॅबिनेट बैठकीवरच बहिष्कार टाकला. शिवसेनेच्या या अनपेक्षित चालीने भाजप खडबडून जागे झाले. भेटीगाठींचा सीलसीला झाला, भाजपकडून सारवासारव झाली. फडणवीसांनीही आधी उल्हासनगरमध्ये तुम्ही केले म्हणून आम्ही कल्याणमध्ये केले, असे प्रत्युत्तर दिले. पण इथून पुढे मित्रपक्षांना डॅमेज होणारे पक्षप्रवेश टाळू असे आश्वासनही दिले.
यानंतर पण शिंदे स्वस्थ बसले नाहीत. त्यांनी थेट दिल्ली गाठली आणि शाहंपुढे तक्रारींचा पाढा वाचला. यावर माझे सगळ्या गोष्टींवर लक्ष आहे, असे सांगून शिंदेंना परत पाठवले. पण शिवसेनेने अचानक केलेल्या या स्फोटामुळे भाजपला नमती भूमिका घ्यावी लागण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुकीपूर्वी या बेकीचे दर्शन होणे हे भाजपला परवडणारे नाही, विरोधकांच्या हातात आयता मुद्दा देण्याची चूक भाजप करणार नाही. त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या प्रवेशाला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. हा ब्रेक शिवसेना आणि राष्ट्रवादीला लागणार असल्याची माहिती आहे.
भाजपला जशास तसे उत्तर देण्यासाठी शिवसेनेने काही असंतुष्ट पदाधिकाऱ्यांना गळाला लावण्याची रणनीती आखली होती. 22 नोव्हेंबरला मित्र पक्षातील या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश सोहळा घ्यावा, अशी विनंती या नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. परंतु, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आाणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी गेल्या दोन दिवसांत झालेल्या चर्चेनंतर हे सर्व संभाव्य प्रवेश रोखण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. महायुतीत वितुष्ट येईल, असे कोणतेही काम करू नका, असे शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना बजावले आहे.


