ताम्हिणी घाट अपघात प्रकरणातील गुढ उलगडलं !
पुणे – कोकण मार्गावरील ताम्हिणी घाटात तीन दिवसांपूर्वी एक थरार अपघात घडला ज्याने संपुर्ण महाराष्ट्र हादरला आहे. नवी कोरी कार घेऊन कोकणात फिरायला निघालेल्या 6 मित्रांचा दुर्दैवी अंत झाला.
थार कारने कोकणात फिरायला जायचं ठरलं आणि मध्येच काळाने घात केला. ताम्हिणी घाटात थार कार 500 फूट खोल दरीत कोसळली आणि पुण्यातील 6 तरुणांचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी रात्री घडला.
अपघात घडल्यानंतर तीन दिवसांनी मुलं बेपत्ता असल्याची माहिती समोर आली होती. हे सर्वजण थार गाडीने कोकणात फिरायला निघाले होते. सहलीसाठी एका हॉटेलमध्ये त्यांनी रूम बुक केली होती; मात्र ठरलेल्या वेळेत ते पोहोचले नाहीत.
हॉटेल मालकाचा फोन अन् पुढे आलं सत्य
बुधवारी सकाळी हॉटेल मालकाने फोन केला, पण प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्याने पुण्यातील एका परिचिताला संपर्क साधून हे तरुण अद्याप आले नसल्याची माहिती दिली. या कॉलमुळे सहा मित्र बेपत्ता असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, घरी परत न आल्याने प्रथम यांच्या वडिलांनी उत्तमनगर पोलिसात तक्रार नोंदवली.
मोबाइल लोकेशनवरून शोध मोहीम सुरु
कोणीच संपर्कात नसल्याने माणगाव पोलिसांनी तरुणांचे मोबाइल लोकेशन तपासले. लोकेशन ताम्हिणी घाटातील दिवा भागातील खोल दरी परिसरात असल्याचे आढळले. हा परिसर दाट जंगल आणि उंच कड्यांमुळे अवघड असल्याने शोधमोहीम कठीण ठरली.
पोलिसांनी रोहा रेस्क्यू टीम, पुणे रेस्क्यू टीम आणि स्थानिक पथकांना घेऊन बुधवारी दुपारपासून ड्रोनच्या सहाय्याने शोधकाम सुरु केला. बराच वेळ काहीही हाती लागले नाही. मात्र संध्याकाळी ड्रोनमध्ये दरीत वाहनाच्या छताचा भाग दिसला आणि अपघाताचे ठिकाण निश्चित झाले. अंधारामुळे पुढील शोध काम पुढे ढकलावा लागला.
बचाव मोहीम सुरु
गुरुवारी सकाळी बचाव मोहीम सुरु करण्यात आली. रॅपलिंगसह तांत्रिक साहित्याचा वापर करण्यात आला. ड्रोनवरील टीमने दिशा सांगत बचावदलाला मार्गदर्शन करण्यात आले. झाडी झुडपात पथकाला चार मृतदेह सापडले. अनेक अडचणींचा सामना करत सहा मृतदेहांना बाहेर काढण्यात यश आले.


