इस्लाम स्वीकारला कारण…
पाश्चात्त्य आणि भारतीय संगीताचा सुंदर मिलाफ करून करोडो रसिक श्रोत्यांना आपल्या संगीतानं मंत्रमुग्ध करणारे प्रसिद्ध संगीतकार म्हणजे ए. आर. रहमान.
रहमान यांनी याआधी अनेकदा त्यांचे धर्माबद्दलचे विचार आणि सूफीवाद स्वीकारण्याच्या निर्णयाबद्दल नेहमीच स्पष्टपणे सांगितले आहे. अशातच अलीकडच्या एका मुलाखतीत, रहमान यांनी त्यांच्यासाठी सूफीवादाची व्याख्या काय आहे आणि वेगवेगळ्या धर्मांच्या धर्मग्रंथांचा अभ्यास केल्यानंतर ते यातून काय शिकले, याबद्दल आपलं मत व्यक्त केलं.
निखिल कामथच्या पॉडकास्टमध्ये रहमान यांना धर्माबद्दल त्यांचं काय मत आहे, असे विचारण्यात आले. त्याबद्दल रहमान म्हणाले, “मी सर्व धर्मांचा चाहता आहे आणि मी इस्लाम, हिंदू व ख्रिश्चन धर्माचा अभ्यास केला आहे. माझी एकच समस्या आहे, ती म्हणजे धर्माच्या नावाखाली लोकांना मारणं किंवा इजा करणं. मला लोकांचं मनोरंजन करायला आवडतं आणि जेव्हा मी त्यांच्यासमोर परफॉर्म करतो तेव्हा मला असं वाटतं की, ते एक तीर्थस्थान आहे. वेगवेगळ्या धर्मांचे लोक, जे वेगवेगळी भाषा बोलणारे अनेक लोक तिथे एकत्र येतात.”
पुढे रहमान यांनी सांगितलं, “लोक वेगवेगळे धर्म पाळतात आणि वेगवेगळ्या भाषा बोलत असले तरी आपली श्रद्धा महत्त्वाची. जोपर्यंत एखादी व्यक्ती आध्यात्मिकदृष्ट्या श्रीमंत असते, तोपर्यंत तो आपली इतर उद्दिष्टं साध्य करू शकतो. आपण वेगवेगळ्या धर्मांचं पालन करीत असलो तरी आपली श्रद्धा महत्त्वाची आहे आणि त्यावर आपला विश्वास असला पाहिजे. हेच आपल्याला चांगल्या गोष्टी करण्यास प्रवृत्त करते. आपण सर्वांनी आध्यात्मिकदृष्ट्या श्रीमंत असणं आवश्यक आहे. कारण- जेव्हा आध्यात्मिक समृद्धी येते तेव्हा भौतिक समृद्धीही येते.”
नसीर मुन्नी कबीर यांच्या ‘ए. आर. रहमान द स्पिरिट ऑफ म्युझिक’ या पुस्तकात, रहमान यांनी सूफीवाद स्वीकारण्याबद्दल सांगितलं होतं, “कोणालाही सूफीवाद स्वीकारण्यास भाग पाडलं जात नाही. जर ते तुमच्या हृदयातून आले, तरच तुम्ही त्याचं अनुसरण करता. सूफी मार्ग हा आमच्यासाठी सर्वोत्तम मार्ग आहे, असं मला आणि माझ्या आईला वाटलं. त्यामुळेच आम्ही इस्लाम स्वीकारला. आमच्याभोवती कोणालाही धर्म परिवर्तनाची पर्वा नव्हती. आम्ही संगीतकार होतो आणि त्यामुळे आम्हाला अधिक सामाजिक स्वातंत्र्य मिळालं.
दरम्यान, रहमान यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी आजवर अनेक सिनेमांसाठी संगीत दिलं आहे. अशातच आता ते त्यांच्या आगामी सिनेमा ‘तेरे इश्क में’च्या संगीतातून रसिकांना पुन्हा एकदा मंत्रमुग्ध करणार आहेत. आनंद एल. राय दिग्दर्शित ‘तेरे इश्क में’च्या गाण्यांची सगळीकडेच क्रेझ आहे. या सिनेमात क्रीती सेनॉन व धनुष यांच्या मुख्य भूमिका आहेत. २८ नोव्हेंबर रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


