दामिनी मालिकेच्या लेखिकेचा धक्कादायक खुलासा; कारणही सांगितलं…
1990 च्या दशकात ‘दामिनी’ ही मराठी टीव्ही मालिका कमालीची लोकप्रिय होती. या मालिकेतील प्रत्येक पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात कायमचं घर केलं आहे.
‘दामिनी’ ही सह्याद्री वाहिनीवर सुरु झालेली पहिली दैनंदिन मालिका होती. या मालिकेचं कथानक प्रेक्षकांना चांगलंच भावलं. या मालिकेच्या लेखिका रोहिणी निनावे होत्या. त्यांच्या लेखनीचाही ही मालिका लोकप्रिय होण्यात मोठा वाटा होता.
रोहिणी निनावे यांनी त्यांच्या मंत्रालयातील नोकरीच्या काळातील काही अत्यंत महत्त्वाचे आणि तितकेच त्रासदायक अनुभव नुकतेच शेअर केले आहेत. माहिती आणि जनसंपर्क खात्यात उपसंपादक आणि नंतर ‘लोकराज्य’ हिंदी मासिकाच्या संपादिका म्हणून काम करताना, ‘हाय प्रोफाईल’ जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांना अनेक अडचणी आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. विशेषतः प्रमोशन मिळाल्यानंतर पुरुष सहकाऱ्यांकडून झालेल्या भेदभावाचा अनुभव त्यांनी व्यक्त केला आहे.
हाय प्रोफाईल जबाबदाऱ्या आणि कामाचा प्रचंड ताण
रोहिणी निनावे यांनी सुरुवातीला माहिती आणि जनसंपर्क खात्यात काम केले. गॅझेटेड ऑफिसर झाल्यावर त्यांच्यावर तब्बल 6 (Six) मंत्र्यांच्या प्रसिद्धीची जबाबदारी होती, ज्यात अण्णा डांगे, तुकाराम दिघोळे, राज पुरोहित, हर्षवर्धन पाटील आणि दिवाकर रावते या तत्कालीन मंत्र्यांच्या खात्यांचा समावेश होता.
बातमी छापून न आल्यास वरिष्ठांकडून शिव्या खाव्या लागत असे. रोज सकाळी सुमारे 50 ते 60 मराठी, इंग्लिश आणि हिंदी वर्तमानपत्रे वाचून, विभागातर्फे आलेल्या बातम्या ‘घारीच्या नजरेने’ तपासणे, तसेच मराठी बातम्यांचे हिंदीत रूपांतर करणे, हे त्यांचे महत्त्वाचे काम होते. हिंदीतून एम.ए. केल्यामुळे त्यांना भाषांतराची इतकी सवय झाली होती की, लग्नपत्रिका वाचतानासुद्धा त्याचे भाषांतर मनातल्या मनात सुरू व्हायचे, असे त्यांनी सांगितले.
मंत्रालयातील नीरस अनुभव आणि एक महागडा मोबाईल
रोहिणी निनावे यांना कृषी आणि ग्रामीण विकास ग्रामीण स्वच्छता अशा विभागांची प्रसिद्धी सांभाळावी लागली, ज्यांच्या कामातील चर्चा त्यांना नीरस वाटायच्या. जेवण झाल्यावर मीटिंग्जमध्ये झोप येत असे, इतक्या त्या कंटाळवाण्या असायच्या, असे त्या सांगतात. मंत्रालयात काम करणारे लोक काम करत नाहीत, असा बाहेरच्या लोकांचा गैरसमज असतो; पण त्यांना जेवायलादेखील 3
ते 4 वाजायचे, इतकी कामे असायची. ‘जो काम करेल, त्याच्यासाठी काम आहे आणि ज्याला करायचे नाही, त्याच्यासाठी नाही,’ असे त्यांचे स्पष्ट मत आहे.
त्या काळात त्यांची आई आजारी असल्यामुळे त्यांच्याकडे मोटोरोला कंपनीचा एक मोठा मोबाईल होता, जो तेव्हा अगदी दुर्मिळ होता. त्यावेळी सचिव लोकांकडेही मोबाईल नसायचा. त्यामुळे अर्जंट काम असल्यास सचिव लोक त्यांच्याकडे मोबाईल मागायचे, अशी आठवण त्यांनी सांगितली आहे.
प्रमोशन आणि पुरुष सहकाऱ्यांचा मानसिक त्रास
रोहिणी निनावे यांनी शिक्षण आणि कामाच्या अनुभवामुळे लवकर प्रमोशन मिळवले. त्यांचे सचिव तर त्यांना ‘यु आर ओवर क्वालिफाइड फॉर धिस जॉब’ असे म्हणत असत. पण याच प्रमोशनमुळे काही पुरुष सहकाऱ्यांच्या पोटात दुखू लागले. प्रमोशन आणि ‘दामिनी’ मालिकेमुळे त्यांचे नाव सतत पेपरमध्ये येत असल्यामुळे, काही पुरुष उमेदवारांचा इगो (Ego) दुखावला गेला, ज्यांना स्वतःला प्रमोशन हवे होते.
या दुखावलेल्या इगोमुळे त्यांनी रोहिणी निनावे यांच्यावर थेट बहिष्कार टाकला. हे सहकारी त्यांच्या केबिनमध्ये येत नसत आणि केबिनच्या बाहेरूनच ऑर्डर्स घेत होते.
या सर्व प्रकारामुळे त्यांना खूप मानसिक त्रास झाला, पण त्यांनी तो सर्व सहन केला. ही सर्व मनावरील साठलेली खदखद आणि अनुभवच त्यांना ‘दामिनी’ मालिका लिहिताना उपयोगी पडले, असे त्यांनी सांगितले.
टीव्ही क्षेत्रातील अनुभव कसा होता?
विशेष म्हणजे, मंत्रालयातील पुरुष सहकाऱ्यांकडून झालेल्या त्रासाच्या तुलनेत त्यांना टेलिव्हिजन क्षेत्रात असा कोणताही अनुभव आला नाही. कोणत्याही पुरुष अधिकारी किंवा अभिनेत्याने त्यांना कधीही त्रास दिला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मंत्रालयातील कामामुळे त्यांना अनेक तऱ्हेच्या माणसांमध्ये वावरण्याचा अनुभव मिळाला, ज्याचा उपयोग त्यांनी लिखाणात ‘समृद्ध लेखन’ करण्यासाठी केला. मंत्रालयातल्या मैत्रिणी निस्वार्थ प्रेम करणाऱ्या आणि सांभाळून घेणाऱ्या होत्या, त्यामुळे त्यांची मैत्री आजही टिकून आहे, असे सांगत त्यांनी जुन्या दिवसांना या पोस्टमध्ये उजाळा दिला आहे.


