मनसेच्या संदीप देशपांडेंचा सवाल…
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये झालेल्या कथित हिंदी-मराठी वादानंतर आत्महत्या केलेल्या अर्णव खैरे या तरुणाच्या मृत्यूनंतर भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी शनिवारी ठाकरे बंधूंना लक्ष्य केले होते.
त्यांच्या नेतृत्त्वाखाली मुंबईत ‘सद्बुद्धी द्या’ आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाला आणि अमित साटम यांच्या टीकेला मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले. अर्णव खैरे याच्या मृत्यूचा तपास पूर्ण झाला नसताना भाजपने त्यावरुन नीच राजकारण सुरु केले आहे, अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली.
भाजप पक्ष पालघरमध्ये साधूंची हत्या करणाऱ्या काशिनाथ चौधरी यांना पक्षप्रवेश देण्याच्या तयारीत होता. यावरुन तुम्हाला हिंदूंबद्दल किती प्रेम आहे, हे दिसते. भाजपची इतकी वैचारिक दुरावस्था झाली आहे, असे वक्तव्य संदीप देशपांडे यांनी केले. अर्णव खैरे याचा मृत्यू भाषेमुळे झालेल्या वादातून झाला, असे त्यांचे वडील सांगतात. मी त्यांचा दावा नाकारत नाही. पण अद्याप या प्रकरणाचा तपास पूर्ण झालेला नाही. ज्या मुलांनी अर्णवला मारहाण केली, ते अद्याप पकडले गेले नाहीत. आपण अर्णवला भाषिक वादावरुनच मारहाण केली, अशी कबुली अद्याप त्यांनी दिलेली नाही. त्यामुळे अर्णव खैरे याने त्यावरुनच आत्महत्या केली की आणखी दुसरे कारण होते, याबाबत स्पष्टता नाही. या सगळ्याचा तपास होणे अद्याप बाकी आहे. हे सगळं बाहेर येण्यापूर्वी भाजपला आणि अमित साटम यांना इतक्या घाईने आंदोलन करण्याची गरज काय होती? तुम्ही अर्णव खैरेच्या मृत्यूचं राजकारण करण्याचा नीचपणा करताय, हे लक्षात ठेवा, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले.
अमित साटम मुंबईत ‘सद्बुद्धी द्या’ आंदोलन करतात. राज्यात प्रत्येक सरकारच्या काळात लोकांचे मृत्यू झाले आहेत. आम्ही गुजरातच्या दंगलीचा विषय काढला तर नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना ‘सद्बुद्धी द्या’ असे आंदोलन अमित साटम करतील का? गुजरात दंगलीनंतर मोदींनी प्रायश्चित घेतलं होतं, सद्भावना यात्रा काढली होती. अशा बऱ्याच गोष्टींची आठवण आम्हाला करुन द्यावी लागेल. अर्णव खैरे याला मारहाण करणारी मुलं सापडली नसताना भाजपकडून त्याच्या मृत्यूचे नीच राजकारण केले जात आहे. भाजपला महापौर बसवण्याची इतकी घाई का झालेय? सत्तेसाठी भाजप इतका स्वार्थीपणा का करत आहे? एरवी लोकल ट्रेनमधून पडून माणसं मरतात किंवा महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात अमित शाह यांच्यासमोर चेंगराचेंगरी होऊन मृत्यू झाले तेव्हा ‘सद्बुद्धी द्या’ आंदोलन करायचे तुम्हाला सुचले नाही का, असा सवाल संदीप देशपांडे यांनी अमित साटम यांना विचारला.
काँग्रेस पक्ष अमिबासारखा आहे, त्याच्या पायांना आम्हाला उत्तर द्यायचं नाही: संदीप देशपांडे
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाने मनसेसोबत एकत्र न लढण्याची ठाम भूमिका घेतली आहे. मात्र, याबद्दल काँग्रेस पक्षात मतमतांतरे दिसत आहेत. याबाबत बोलताना मनसेच्या संदीप देशपांडे यांनी म्हटले की, काँग्रेस पक्ष हा अमिबासारखा आहे. इथे पण पाय आहे, तिथे पण पाय आहे, एक पाय इथे चालतो, एक पाय दुसरीकडे चालतो. पण निर्णय घेण्याची क्षमता किंवा मेंदू कोणाकडे आहे? पायाकडे की मेंदूकडे आहे, हे कळत नाही. वडेट्टीवारांचा पाय म्हणतो, असं करुया, वर्षा गायकवाड आणि भाई जगतापांचा पाय तिसरीकडे चालतो. अमिबाच्या पायांना उत्तर देण्यात आम्हाला अर्थ वाटत नाही, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले.


