स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विचित्र युत्या, आघाड्या आकाराला येत आहेत. स्थानिक पातळीवरील गरजेनुसार युती वा आघाडी होत आहे. यात वैचारिक भूमिका कुठेही नाही. राज्य पातळीवर सध्या महायुती, महाविकास आघाडी आहे, तर केंद्रात एनडीए आणि इंडिया आघाडी आहे.
भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे महाराष्ट्रातील पक्ष या युती आणि आघाडींमध्ये विखुरलेले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये दोन गट आहेत. एक गट महायुती तर दुसरा महाविकास आघाडीत आहे. राज्य आणि केंद्रीय पातळीवरील ही युती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मात्र बिघडली आहे. सध्या नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुका लागल्या आहेत.
2 डिसेंबरला मतदान असून 3 डिसेंबरला मतमोजणी आहे. या निवडणुकांसाठी अनेक ठिकाणी मित्र पक्षच परस्परांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. जळगावच्या चोपडा नगर परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीत फूट पडली आहे. तिथे सर्वसामान्यांना चक्रावून टाकणारी आघाडी आकाराला आली आहे. त्यावर शरद पवारयांच्या पक्षातील पदाधिकाऱ्याने आपल्या मनातली खदखद बोलून दाखवली. कारण त्यांचा पक्ष चोपडा नगर परिषद निवडणुकीत एकटा पडला आहे.
लोकांना या गोष्टींचा वीट आला आहे
सत्तेत वाटा मिळावा यासाठीच काँग्रेस हा पक्ष शिवसेना शिंदे गटासोबत युती करून सोयीच राजकारण करतोय” अशी टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी डॉ चंद्रकांत बारेला यांनी केली आहे. चोपडा नगर परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसने महाविकास आघाडीला सोडून शिंदे गटासोबत युती केली. त्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्याने नाराजी व्यक्त केली आहे. “काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गट एकत्र आलं म्हणून मतदार सुद्धा एकत्र येतील एवढी जनता दूध खुळी नाही, लोकांना या गोष्टींचा वीट आला आहे” असं डॉ.चंद्रकांत बारेला यांनी म्हटलं आहे.
शरद पवार गट एकटा पडला
लोक या अभद्र युतीला कंटाळले आहेत. कदाचित सत्तेच्या तसेच पैशांच्या मोहापायी आज चित्र बदललेलं आहे, मात्र ते फार काळ टिकणार नाही” असं देखील बारेला म्हणाले. राष्ट्रवादी शरद पवार गट चोपडा नगर परिषदेच्या निवडणुकीत केवळ दोन जागा लढत आहे. जळगावच्या चोपडा नगर परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत फूट पडली असून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने राष्ट्रवादी शरद पवार गटाला लांब ठेवल्याचे पहायला मिळत आहे. चोपडा नगरपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसने चक्क शिवसेना शिंदे घटना सोबत युती केली तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट स्वबळावर लढत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एकटा पडला आहे.


