नेमके प्रकरण काय ?
ऑक्टोबर महिन्यात 28 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांच्या घरात चोरी झाल्याची माहिती समोर आली होती. जळगाव शहरातील शिवराम नगर भागातील मुक्ताई बंगल्यात ही चोरी झाली होती.
खडसे हे आपल्या कुटुंबासोबत दिवाळी सुटीनिमित्त बाहेरगावी गेले असताना ही चोरी झाली. पण आता या चोरीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कारण या चोरीच्या घटनेतील मुख्य आरोपी हा पोलिसांच्या हाती लागला आहे. मस्जिद बंदर येथील चोरीच्या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांच्या हाती हा चोर लागला आहे. खडसेंच्या घरी तीन चोरट्यांनी चोरी केली होती. त्यातील मोहम्मद बिलाल हा आरोपी पोलिसांच्या हाती लागला आहे.
13 ऑक्टोबरला म्हणजेच खडसेंच्या घरी चोरी करण्यापूर्वी मुंबईतील मस्जिद बंदर येथे नऊ लाख रुपयांची चोरी झाली होती. याच प्रकरणी शनिवारी (ता. 22 नोव्हेंबर) पायधुनी पोलिसांनी त्या प्रकरणातील आरोपी मोहम्मद बिलाल अब्दुल रझाक चौधरी याला उल्हासनगर येथून अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मस्जिद बंदर येथील चोरीचा तपास करताना पोलिसांनी तब्बल 500 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. त्याचवेळी आरोपी बिलाल उल्हासनगर येथे असल्याचा पोलिसांना सुगावा लागला. ज्यानंतर पोलिसांनी ताबडतोब कारवाई करत त्याला उल्हासनगर येथे तो लपून बसलेल्या ठिकाणावरून अटक केली. यावेळी पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्यानेच मागच्या महिन्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या घरी सुद्धा चोरी केली असल्याची माहिती पोलिसांना दिली.
28 ऑक्टोबरला मुक्ताईनगर येथील कोथळी गावातील एकनाथ खडसे यांच्या बंगल्यामध्ये चोरी झाली. चोरट्यांनी सात लाख रुपयांचे दागिने, एक सीडी आणि एक पेन ड्राइव्ह चोरून नेले होते. चोरी झाल्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी केअरटेकर बंगल्यावर आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. यानंतर एकनाथ खडसे यांनी माध्यमांना सांगितले की, बंगल्यात कोणीही नव्हते, ज्याचा फायदा चोरट्यांनी घेतला. त्यांनी माझ्या खोलीतून पाच ग्रॅम वजनाच्या चार सोन्याच्या अंगठ्या चोरल्या, ज्या मुलांसाठी भेट म्हणून ठेवल्या होत्या. त्यांनी 35 हजार रुपये रोख देखील घरातून चोरले. याशिवाय, एका नातेवाईकाचे सुमारे 50 ग्रॅम सोने देखील या चोरीत चोरीला गेले होते. खडसेंच्या घरातील चोरीचा तपास करताना पोलिसांनी उल्हासनगरमधील दोन ज्वेलर्सना अटक केली होती. ज्यांनी चोरीचे दागिने खरेदी केले होते. पण या प्रकरणातील मुख्य आरोपी एजाज अहमद, मोहम्मद बिलाल आणि बाबा फरार होते. पण आता बिलालच्या अटकेमुळे तपासाला महत्त्वपूर्ण दिशा मिळाली आहे. त्याच्या अटकेमुळे जळगाव पोलिसांना दोन्ही प्रकरणे जोडण्यास मदत होईल.


