देवाभाऊंची सारवासारव
आ काहीही केले, बोलले, तरी कोणीही आमचे काहीही बिघडवू शकत नाही, असे जेव्हा नेत्यांना वाटायला लागले की, त्याला सत्तेचा माज आला, असे वैदर्भीय भाषेत म्हटले जाते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचा समावेश अशाच नेत्यांमध्ये हल्ली केला जातो.
ते सातत्याने करीत असलेले वादग्रस्त विधाने हे त्यासाठी कारणीभूत ठरले आहेत. आता निवडणुकीच्या काळात त्यांनी मते दिली तरच निधी मिळेल, अशा स्वरुपाचे विधान करून पुन्हा वाद निर्माण केला. त्याचे पडसाद रविवारी नागपुरात उमटले. नागपूर दौऱ्यावर आलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दादांच्या वक्तव्यावर तीव्र शब्दात संताप व्यक्त केला. पण त्याचवेळी नागपुरात असलेल्या देवाभाऊंना (मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस) सारवासारव करावी लागली.
राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा धुरळा उडायला सुरूवात झालीय. प्रत्येक नेता, पक्ष मतदारांना विकास करण्याचं आश्वासन देताहेत. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगावमध्ये (जि. पुणे) प्रचार करताना मतदारांना थेट धमकीच दिली. तुम्ही मला मतदान करा मी तुम्हाला कामे करुन देईल. तुम्ही काट मारली तर मी पण निधीत काट मारणार, असे ते म्हणाले. ही एक प्रकारे अजित पवारांनी मतदारांना दिलेली धमकीच आहे. यावरूनच अजित पवारांवर चौफेर टीका सुरू झाली.
खरे तर निवडणुकीच्या काळात मतदारांना प्रभावित करणारी कोणतीही कृती किंवा विधान आदर्श आचारसंहितेचा भंग ठरतो. असे करणारा जर मंत्री असेल तर प्रकरण अधिक गंभीर. पण याची दखल घेणारी यंत्रणा तशी तटस्थ असायला हवी. पण तसे होत नाही. त्यामुळे अजितदादांच्या विधानाची तीव्र प्रतिक्रिया संपूर्ण राज्यात उमटली. नागपूर त्याला अपवाद नव्हते. रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे हे दोघे विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने नागपुरात होते. त्यांना पत्रकारांनी दादांच्या विधानावर प्रतिक्रिया विचारल्या. अपेक्षेप्रमाणे सुप्रिया सुळे यांनी कठोर शब्दांत भावना व्यक्त केल्या. अजितदादाचे नाव न घेता त्यांनी निवडणूक आयोगावर दोषारोपण केले. त्या म्हणाल्या “अशा विधानाची दखल निवडणूक आयोगाने घ्यायला हवी, त्यांच्याकडूनच कारवाईची अपेक्षा आहे. पण दुर्दैवाने आयोगाकडून अशी अपेक्षा नाही, मतदारांना धमकावणे गंभीर बाब आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना अजितदादांना पाठीशी घालण्याचा, प्रयत्न केला. ते म्हणाले “निवडणुकीत अशा प्रकारची विधाने करावीच लागतात. ती गांभीर्याने घ्यायची नसतात. अजितदादांनी सुध्दा त्या अर्थाने ( मत न दिल्यास निधी नाही) विधान केले नसावे. महायुतीचाच पालिका निवडणुकीत विजय होईल व आम्ही सर्व शहरांचा विकास करू.
पवार यांचे विधान आचारसंहितेचा भंग करणारे असताना राज्याच्या प्रमुखांनी त्याची गांभीर्याने दखल घेणे, किमान पुन्हा कोणी असे वक्तव्य करू नये, म्हणून तंबी देणे अपेक्षित होते. पण तसे न करता त्यावर पांघरूण घालणे, अचंबित करणारे ठरले.
दोनच दिवसांपूर्वी नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी “खर्चाचे मी पाहून घेईल” असे वक्तव्य केले होते. तेसुद्धा आपल्याला निवडणूक आयोगाची भीती वाटत नाही, असे दर्शवणारे आहे. काहीही करा पण निवडणुका जिंका याच दिशेने महायुतीची वाटचाल सुरू असल्याचे सध्याचे चित्र आहे.


