गौरीला अखेरचा निरोप देताना वडिलांनी हंबरडा फोडला !
राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नीने दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली.
डॉ. गौरी पालवे यांनी पती अनंत गर्जे आणि त्याच्या कुटुंबियांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. पण गौरीची हत्या झाल्याचा आरोप तिच्या कुटुबियांकडून केला जात आहे. या प्रकरणी वरळी पोलिसांनी रात्री अनंत गर्जे याला अटक करण्यात आली. त्यानंतर आज सकाळी गौरीच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार करण्यात आले.
यावेळी पालवे यांच्या नातेवाईकांनी अनंत गर्जे (Anant Garje) यांच्या घरासमोरच आपल्या मुलीवर अग्निसंस्कार करण्याचा आग्रही धरला होता. त्यावेळी गर्जे आणि पालवे कुटुंबियांमध्ये जोरदार वादही झाला. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद मिटला. त्यानंतर अनंत गर्जे यांच्या घराशेजारीच डॉ. गौरी पालवे यांच्या पार्थिवावर अग्निसंस्कार करण्यात आले. पण त्यानंतरही गावात अद्यापही तणावाचे वातावरण आहे.
गौरीच्या पार्थिवावर अत्यंसस्कार सुरू असताना गौरीच्या वडिलांना शोक अनावर झाला. त्यांनी हंबरडा फोडला. सर्वांदेखत ते धाय मोकलून रडू लागले. पोलिस अधिकाऱ्यांसमोरच त्यांनी विनवणी केली. ” तुम्हाला मुली द्यायच्या असतील तर आम्हाला द्या, तुमच्या मुली गरीबाला द्या. श्रीमंतांच्या भपक्यावर जाऊ नका, त्याच्या नादी लागू नका,” गौरीच्या वडिलांना अशा अवस्थेत पाहून उपस्थितांनाही अश्रू अनावर झाले. दरम्यान, सुरुवातीला अनंत गर्जेला अटक झाल्याची माहिती नसल्याने गौरीच्या कुटुंबियांनी अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला होता. पण पोलिसांनी गर्जेला अटक झाल्याची माहिती देत त्यांची समजूत काढली आणि त्यानंतर तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, रविवारी रात्री सुमारे १ वाजता वरळी पोलिसांनी अनंत गर्जे यांना अटक केली. डॉ. गौरी पालवे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून अनंत गर्जे, त्यांचा भाऊ आणि बहिणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज अनंत गर्जे यांना न्यायालयात हजर करण्यात येणार असून, त्यांची पोलीस कोठडीची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचदरम्यान, काही वेळापूर्वीच पोलिसांचे एक पथक वरळीतील अनंत गर्जे यांच्या घरी रवाना झाले आहे. या पथकात डॉक्टर आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांचा समावेश असून, झाडाझडतीदरम्यान कोणते महत्त्वाचे पुरावे सापडतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
२ फेब्रुवारी २०२५ रोजी डॉ. गौरी पालवे आणि अनंत गर्जे यांचे लग्न मोठ्या थाटामाटात झाले होते. गौरी नायर हॉस्पिटलमध्ये डेंटीस्ट म्हणून कार्यरत होत्या. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, अनंत गर्जे यांनी गौरीचा सातत्याने छळ केला. सप्टेंबरमध्ये घर शिफ्ट करताना गौरीला घरात अनंतच्या अफेअरशी संबंधित काही कागदपत्रे सापडली, ज्यामुळे तिला अनंतबद्दल संशय निर्माण झाला. कुटुंबीयांच्या दाव्यानुसार, याच परिस्थितीमुळे गौरीने आत्महत्या केल्याचा आरोप केला जात आहे.


