चंद्रकांत पाटलांचे अजित पवारांना प्रत्युत्तर !
राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा धुरळा उडाला आहे. सत्ताधारी आणि विरोधक प्रचारात उतरले आहेत. महायुतीकडून जोरदार प्रचार सुरू झाला आहे.
भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये कलगीतुरा रंगलेली असताना त्यात राष्ट्रवादी काँग्रेसची भर पडली आहे.
मुख्यमंत्रीसह दोन्ही उपमुख्यमंत्री आपल्या पक्षाच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहे. याचदरम्यान, अजित पवार यांनी “तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांना मतदान करा, तुमच्या भागाला निधी कमी पडू देणार नाही. तुमच्या हातात मत आहे, तर माझ्या हातात निधी आहे,” असे विधान केले. यावर आता चंद्रकांत पाटील यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे.
“तुमच्या हातात तिजोरीच्या चाव्या असल्या तरी त्या तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे. मालकाच्या परवानगीशिवाय तिजोरी उघडता येत नाही, आणि जर का ती उघगडली तर त्याला काय म्हणतात हे तुम्हाला माहिती आहे, असा खोचक टोला चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांना लगावला आहे. कोल्हापूरच्या गडहिंग्लजमध्ये प्रचार सभेच्या शुभारंभ प्रसंगी चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केले आहे. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याने आता महायुतीमधील धुसफूस समोर आली आहे.
विरोधकांकडे एक मंत्री असले तर…
“विरोधक प्रचारात म्हणतील आमच्याकडे तिजोरीच्या चाव्या आहेत. पण तिजोरीचा मालक आपल्याकडे असल्यामुळे विकासाची काळजी करू नका. विरोधकांकडे एक मंत्री असले तर आम्ही इकडे दोन मंत्री आहोत. आम्ही महायुतीत असल्यामुळे एकमेकांवर टीका करायचे नाही असं ठरवलं आहे. आतापर्यंत मुश्रीफ यांनी टीका केली नाही पण त्यांनी टीका केली तर मी कशी टीका करतो हे तुम्हाला माहिती आहे,”असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे
अजित पवार काय म्हणाले होते?
अजित पवार धाराशिवमध्ये मतदारांना म्हणाले होते, “बाकीच्या सगळ्या गोष्टी डोक्यातून काढा. अजिबात काही विचार करू नका. तुम्ही मला सर्व १८ उमेदवार निवडून दिले तर तुम्हाला सांगितलेलं सगळं तयार आहे. तुम्ही माझ्या उमेदवारावर फुली मारली तर मी पण फुली मारणार,” असे म्हंटले होते.
पुढे अजित पवार म्हणाले होते की माझ्या हातात राज्य सरकारची तिजोरी आहे. माझ्या घड्याळाच्या पाठीशी उभे राहिलात तर बारामतीसारखा विकास तुमच्याकडे करू शकतो. अर्थमंत्री म्हणून मी धाराशिवकडे बारकाईने लक्ष देईन. मत देणं हे तुमच्या हातात आहे. निधी देणं माझ्या हातात आहे. बाकी तुम्ही बघा.


