अजित पवारांनी योगेश क्षीरसागर यांना भर सभेत झापलं; म्हणाले…
बीड नगरपालिकेवर सत्ता स्थापित करण्यासाठी उमेदवारांच्या विजयासाठी उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत . बीडमध्ये झालेल्या पहिल्याच जाहीर सभेत अजित पवारांनी राष्ट्रवादी सोडून नुकतंच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या योगेश क्षीरसागर यांच्यावर थेट टीका करत निशाणा साधलाय . क्षीरसागरांना 35 वर्ष दिली, मला केवळ पाच वर्ष द्या.
त्यांच्या 35 वर्षात जे काही होऊ शकलं नाही ते पाच वर्षात अजित पवार करून दाखवेन, असे आवाहन त्यांनीयावेळी केले. तर याच वेळी योगेश क्षीरसागर यांच्यावर देखील अजित दादांनी निशाणा साधला. 53 उमेदवार ठरविण्यासाठी एबी फॉर्म पाठवा, असे त्यांनी म्हटले. मात्र, हे तुझ्या काकाच्या घरचं आहे का? तू काय पक्षाचा मालक झाला का?, असं म्हणत अजित पवारांनी योगेश क्षीरसागर यांना भर सभेतून झापले.
हट्ट धरण्यासाठी आम्ही बालिश नाहीत, खालची टोळी अजित दादांना मीस गाईड करतेय
दरम्यान अजित पवार यांच्याच टीकेला योगेश क्षीरसागर यांनी प्रत्युत्तर दिले. 35 वर्षात आम्ही काय केले, अनेक कामं केली. 100 कोटींचे जे प्रोजेक्ट झालेत त्यातील अनेक काम याठिकाणी झाली. 33 वर्षात सात वेळा निवडणुका झाल्या म्हणून लोकांनी देखील साथ दिली. खालची टोळी अजित पवारांना मीस गाईड करत आहे. हट्ट धरण्यासाठी आम्ही बालिश नाहीत. एबी फॉर्मचा हट्ट आम्ही धरला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या काकांचा आहे. इथे मोठी गटबाजी झाली होती. त्याची दखल कोणी घेतली नाही, अशा शब्दांत योगेश क्षीरसागर यांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिले.
बीड नगरपालिकेत नगराध्यक्ष पदासाठी 19 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
बीड नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी 19 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये निवृत्त नायब तहसीलदार, डॉक्टर, वकील आणि पदवीधारक उमेदवारांचा समावेश आहे. 24 वर्षांची दिव्या स्वामी ही तरुणी नगराध्यक्ष पदाची सर्वात तरुण उमेदवार आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार प्रेमलता पारवे सर्वात ज्येष्ठ उमेदवार आहेत.
24 वर्षांची दिव्या स्वामी उच्च पदवीधर असून अपक्ष निवडणूक लढत आहे. मात्र निवडणूक विभागाकडून कोणतेही चिन्ह मिळाले नसल्याने प्रचारासाठी अपक्ष उमेदवारांना अडचणींचा सामना करावा लागतोय. चिन्ह मिळाल्यानंतर मतदारांपर्यंत ते पोहोचविण्याकरिता केवळ पाच दिवसांचा अवधी उमेदवारांकडे असणार आहे. याबाबतची खंत उमेदवारांकडून बोलून दाखवली जात आहे. तर कार्यकर्त्यांची होत असलेली निवडणूक नेत्यांनी प्रतिष्ठेची बनवलीय. यात अपक्ष उमेदवारांचा निभाव कसा लागतो? हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे.


