दोघांच्या वादामुळे माझं…
केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप खासदार रक्षा खडसे यांनी एकनाथ खडसे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांच्यात सुरू असलेल्या राजकीय वादावर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. चोपड्यातील प्रचारसभेत बोलताना त्यांनी दोन्ही नेत्यांमधील तणावामुळे आपली अडचण स्पष्ट शब्दांत व्यक्त केली.
रक्षा खडसे म्हणाल्या की, एकनाथ खडसे हे आपले सासरे असून त्यांच्याबद्दल नेहमीच आदर आहे. तर गिरीश महाजन हे पक्षातील ज्येष्ठ नेते असून वडिलांसारखे जवळचे आहेत. त्यामुळे दोघांमध्ये वाद सुरू झाला की आपण मध्ये अडकल्यासारखे होते, असे त्यांनी सांगितले. “एकीकडे नाथाभाऊ सासरे आहेत आणि दुसरीकडे गिरीषकाका वडिलांसारखे आहेत. दोघांच्या वादामुळे माझं सँडविच होतं,” असे त्या म्हणाल्या. त्यांच्या या वक्तव्यामुळे सभेत उपस्थित कार्यकर्त्यांमध्येही कुजबुज सुरू झाली.
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील मतभेद नवीन नाहीत. मुक्ताईनगर मतदारसंघात भाजपच्या एका गटाकडून शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांना मदत केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो. या मुद्यावर विचारले असता रक्षा खडसे म्हणाल्या की, भाजपची ताकद असल्यामुळेच चंद्रकांत पाटील निवडून आले. मतदारांनी भाजपवर विश्वास ठेवूनच त्यांना संधी दिली, असे त्यांनी सांगितले.
चोपड्यातील प्रचार रॅलीत भाजप आणि अजित पवार गटाची युती स्पष्ट दिसून आली. मात्र दुसरीकडे शिवसेना शिंदे गट या युतीपासून दूर राहिल्याचे चित्र दिसत आहे. निवडणूक जवळ येत असताना या भागातील राजकीय कल्लोळ वाढत असून विविध गटांमधील संघर्ष अधिकच प्रकर्षाने समोर येत आहे.
या पार्श्वभूमीवर रक्षा खडसे यांच्या वक्तव्याने नव्या चर्चेला तोंड फोडले आहे. खडसे-महाजन वाद हा राज्याच्या राजकारणातील चर्चेचा विषय कायम राहिला असून या वादामुळे पुन्हा एकदा गटबाजी समोर आल्याची भावना राजकीय वर्तुळात निर्माण झाली आहे. आगामी निवडणुकीत त्यांच्या वक्तव्याचा काय परिणाम होईल, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.


