महाराष्ट्राच्या राजकारणात पूर्वपार चालत आलेली घराणेशाहीची परंपरा अलीकडच्या काळात आणखीनच जोमाने वाढताना दिसत आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निमित्ताने याचे पुन्हा एकदा प्रत्यय येताना दिसत आहे.
राज्यातील अनेक नगरपंचायती आणि नगरपरिषदांमध्ये सर्वच पक्षाच्या राजकारण्यांकडून आपापल्या घरातील सदस्यांना मोठ्या प्रमाणावर उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेत याचा कळस गाठला गेला आहे.
कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून एका घरातील दोन-तीन नव्हे तर सहा जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता राजकारणात सामान्य कार्यकर्त्यांचे स्थान फक्त सतरंज्या उचलण्यायच्या का? अशी टीका करण्यात येत आहे.
एकना शिंदेंच्या शिवसेनेने बदलापूर शहर शिवसेना शहराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या घरातील सहा जणांना तिकीट देण्यात आले आहे. वामन म्हात्रे यांच्यासह त्यांची पत्नी, भाऊ, मुलगा, भावजई, भाचा अशा एकूण एकाच घरातील ६ जणांना शिवसेनेचे तिकीट मिळाले आहे. वामन म्हात्रे यांचा भाऊ तुकाराम म्हात्रे, भावजय उषा म्हात्रे, मुलगा वरुण म्हात्रे आणि पुतण्या भावेश म्हात्रे यांना नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी मिळाली आहे.
2015 मध्ये सुध्दा वामन म्हात्रे यांच्या परिवारातील चार जणांना महापालिकेची उमेदवारी देण्यात आली होती. निवडणूक अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होण्यापूर्वीच वामन म्हात्रे यांनी आधीच स्पष्ट केले होते की, ज्या ठिकाणी पक्षाला उमेदवार भेटणार नव्हते तेथेच आपल्या नातेवाईकांना उमेदवारी दिली आहे.
कार्यकर्त्यांची भावना होती की, त्या प्रभागात उमेदवारी अर्ज भरला नाही तर त्या प्रभागत अन्य कोणी उमेदवार बिनविरोध निवडून येऊ शकतो. कार्यकर्त्यांची भावना पाहता त्या प्रभागत नातेवाईकांना उमेवदारी दिली आहे, असे देखील त्यांनी सांगितले होते.
भाजपची शिवसेनेवर टीका
भाजप आमदार किसन कथोरे यांनी सांगितले की, हे खरं म्हणजे त्यांना स्वत:ला कळायलाा पाहिजे. आत्ता सहा कार्यकर्त्यांना तेथे संधी मिळाली असती. पण जेवढे लुटता येईल तेवढे लुटा ही लूटशाही असेल तर ते बरोबर नाही. त्यांनी जे काही केले त्यावर जनता निर्णय घेईल. जनता त्यांना धडा शिकवेल.


