समिर शिरवडकर-रत्नागिरी.
राजापूर:- रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या संकल्पनेतून ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या समस्यांवर तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी जिल्ह्यात ‘मिशन प्रतिसाद’ हा विशेष उपक्रम राबविला जात आहे. समाजातील सर्वात अनुभवी आणि संवेदनशील घटक असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य, एकाकीपणा, फसवणूक तसेच आपत्कालीन प्रसंगी तत्काळ मदत न मिळणे यांसारख्या प्रश्नांची वाढती तीव्रता लक्षात घेता त्यांच्या सुरक्षेची काळजी हा काळाचा अत्यावश्यक विषय बनला आहे. याच पार्श्वभूमीवर हा उपक्रम विशेष महत्त्व प्राप्त करतो.
या उपक्रमांतर्गत सागरी पोलीस ठाणे नाटे येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी नाटे पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच साने गुरुजी विद्यामंदिर, जाणार जानशी येथे आयोजित कार्यक्रमात जिल्हा पोलीस दल आणि अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शना नुसार सर्व ज्येष्ठ नागरिकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमावेळी व्यासपीठावर मीठ गावाने पंचक्रोशी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विलास चेऊलकर, पुणे येथील हेमंत गोखले, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, रमेश राणे, बलवंत सुतार, अमर आडीवरेकर, पुनम मयेकर, मुख्याध्यापक प्रसाद शिवणेकर, सौ. स्नेहल सुतार पत्रकार राजन लाड आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच शिक्षक, पालक, ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी आणि विद्यार्थी उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
जिल्ह्यातील पोलीस दल ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी सक्रियपणे पुढे येत असल्याने जनतेत विश्वास वाढत असून, पोलीस जनता नात्यात सकारात्मक बंध अधिक मजबूत होत असल्याचे याप्रसंगी दिसून आले.
