पालघर प्रतिनिधी – रवि राठोड
पालघर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक (चार रस्ता) येथे आज वाहतुकीचा पूर्णपणे खेळखंडोबा झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. शहरातील अत्यंत वर्दळीच्या या चौकात केवळ एकाच ट्राफिक पोलिसाच्या भरवशावर संपूर्ण वाहतूक नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न सुरू असल्याने वाहनचालक व नागरिकांचे प्रचंड हाल झाले.
चार रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सततचे हॉर्न, गोंधळ आणि बेशिस्त वाहनचालकांमुळे काही काळासाठी परिसरात अराजकाची स्थिती निर्माण झाली होती. अनेक रिक्षा व कारचालकांनी वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवत मिळेल त्या दिशेने, तर काहींनी थेट उलट्या दिशेने वाहने चालवली. यामुळे अपघाताचा धोका वाढून पादचाऱ्यांसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
याबाबत वाहतूक प्रभारी अधिकारी सुरेश साळूंखे यांनी माहिती देताना सांगितले की, उद्या होणाऱ्या निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. त्यामुळे वाहतूक विभागात कर्मचारी कमतरता निर्माण झाली असून, त्याचा थेट परिणाम आजच्या वाहतूक व्यवस्थेवर झाला आहे.
दरम्यान, शहरवासीयांनी प्रशासनाच्या नियोजनावर नाराजी व्यक्त केली असून, चार रस्त्यासारख्या अतिवर्दळीच्या ठिकाणी अतिरिक्त ट्राफिक पोलिसांची तातडीने नियुक्ती करावी, तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली आहे.
