पालघर प्रतिनिधी : मिलिंद चुरी
पालघर: पालघर जिल्ह्याच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासाला चालना देणाऱ्या जिल्हा नियोजन समितीची महत्त्वपूर्ण बैठक वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाहिर आत्माराम पाटील नियोजन समिती सभागृहात पार पडली. या बैठकीत सन २०२६–२७ साठी ६७४.१७ कोटी रुपयांच्या जिल्हा वार्षिक विकास आराखड्यास एकमताने मंजुरी देण्यात आली.
बैठकीत जिल्हा वार्षिक योजना, आदिवासी घटक कार्यक्रम, पर्यटन विकास, सांस्कृतिक वारसा संवर्धन तसेच पायाभूत सुविधांबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यावेळी आमदार ॲड. निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, राजेंद्र गावीत, शांताराम मोरे, विलास तरे, हरिश्चंद्र भोये, स्नेहा दुबे-पंडित, राजन नाईक, जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड, वसई-विरार महापालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, प्रकल्प अधिकारी (डहाणू) विशाल खत्री, जिल्हा नियोजन अधिकारी प्रशांत भामरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली झालेल्या अपघाती निधनाबद्दल जिल्हा नियोजन समितीच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
सन २०२६–२७ साठी शासनाने जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत आदिवासी घटक कार्यक्रमासाठी ४१०.४३ कोटी, सर्वसाधारण योजनेसाठी २४९.७४ कोटी आणि विशेष घटक योजनेसाठी १४ कोटी रुपये अशी एकूण ६७४.१७ कोटी रुपयांची मर्यादा निश्चित केली आहे. या निधीच्या चौकटीत सादर करण्यात आलेल्या विकास आराखड्यास समितीने मंजुरी दिली. तसेच सर्वसाधारण व आदिवासी घटक योजनेसाठी अनुक्रमे ३३३.५० कोटी व १०० कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधी मागणीस शासनाकडे सादर करण्यास मान्यता देण्यात आली.
सन २०२५–२६ मधील योजनांअंतर्गत मंजूर झालेल्या कामांना प्राधान्य देण्याचे निर्देश पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिले. त्या वर्षासाठी ७९९.४३ कोटींच्या निधीपैकी जानेवारी २०२६ अखेर ५५९.५६ कोटींच्या कामांना मान्यता देण्यात आली असून २७०.३६ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.
पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी उत्तर कोकण चेंबर ऑफ कॉमर्स अँड अॅग्रीकल्चर (एनकेसीसीए) सोबत सामंजस्य करार करण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमांतर्गत युवकांसाठी रील स्पर्धा, डिजिटल कथन, जनजागृती मोहिमा तसेच दर्जेदार पर्यटन माहिती साहित्य निर्मिती करण्यात येणार आहे. यामुळे स्थानिक उपजीविका, नवकल्पना आणि लोकसहभागाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
यावेळी स्वातंत्र्यलढ्यातील महान आदिवासी क्रांतीकारक धरती आबा बिरसा मुंडा यांच्या स्मारकाच्या उभारणीस सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. तसेच पालघर जिल्ह्याचे भूषण असलेले ज्येष्ठ तारपावादक पद्मश्री भिकल्या धिंडा यांचा शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.
आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत ‘संपूर्णता अभियान २.०’ चा शुभारंभ करण्यात आला. यासोबतच श्रीकृष्ण मंदिर (गालतरे, वाडा), पद्मनाभ स्वामी मंदिर (टेंभोडे, पालघर) आणि शीतलादेवी मंदिर (केळवे, पालघर) या तीन तीर्थक्षेत्रांना ‘क’ वर्ग दर्जा देण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला.
