पालघर प्रतिनिधी मिलिंद चुरी
चिंचणी :- विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक व नैतिक विकासासाठी सूर्यनमस्कार हे प्रभावी माध्यम असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. दी चिंचणी–तारापूर एज्युकेशन सोसायटी संचलित एम. के. ज्युनिअर कॉलेज, चिंचणी येथे सूर्यनमस्कार दिनानिमित्त भव्य सामूहिक सूर्यनमस्कार व योगाभ्यास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमात सुमारे ८० विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सूर्यनमस्कार करत योगाचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवलं. महाविद्यालयाचे क्रीडा व सूर्यनमस्कार शिक्षक सुधीर भांडवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली दृकश्राव्य माध्यमे व प्रात्यक्षिकांच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना एकाग्रता, श्वसनशुद्धी व शारीरिक सुदृढतेचा अनुभव देण्यात आला.
विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता, शिस्त, आत्मविश्वास आणि सकारात्मक जीवनदृष्टी विकसित करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. शाळा व महाविद्यालयीन वयात सूर्यनमस्काराची सवय लागल्यास भविष्यात निरोगी आणि जबाबदार नागरिक घडण्यास निश्चितच मदत होते, असे प्रतिपादन पर्यवेक्षक प्रा. सूरज आष्टेकर यांनी केले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षकवृंद व स्वयंसेवकांचे मोलाचे सहकार्य लाभले. अशा आरोग्यवर्धक उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली. यावेळी पर्यवेक्षक प्रा. दिनकर टेकनर, प्रा. वैशाली महाजन तसेच विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
