पालघर प्रतिनिधी : मिलिंद चुरी
बोईसर :पालघर जिल्हा पोलीस दलाच्या पुढाकाराने राबविण्यात आलेल्या ३७ व्या रस्ता सुरक्षा अभियान २०२६ चा सांगता समारोप सोहळा नागझरी (ता. जि. पालघर) येथील अधिकारी ब्रदर्स मैदान, संस्कृती शाळेजवळ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. सुरक्षित वाहतूक, नियमांचे पालन आणि नागरिकांमध्ये जनजागृती या त्रिसूत्रीवर आधारित या अभियानाचा समारोप विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
या कार्यक्रमास बोईसरचे उपविभागीय अधिकारी विकास नाईक, सायबर सेल अधिकारी रुपाली गुंड वर्तक, वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी सुरेश साळुंखे तसेच मनोर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी रणवीर बयेस व इतर मान्यवर यांची प्रमुख उपस्थिती होती.
अभियानांतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी वाहतूक नियमांविषयी प्रबोधन, जनजागृती कार्यक्रम, शाळा–महाविद्यालयांमधील उपक्रम तसेच प्रत्यक्ष वाहनचालकांशी संवाद साधण्यात आला. सांगता कार्यक्रमात स्थानिक कलाकारांनी सादर केलेल्या नाटिकांमधून रस्ता सुरक्षा नियम आणि वैयक्तिक जबाबदारीचे महत्त्व प्रभावीपणे अधोरेखित करण्यात आले.
या वेळी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ तारपा वादक भिकल्या धिंडा यांचा पालघर पोलिसांकडून यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच रुग्णवाहिकेद्वारे रुग्णसेवा बजावणारे मनोर येथील अखिल सैय्यद यांचाही गौरव करण्यात आला.
समारोपप्रसंगी बोलताना उपविभागीय अधिकारी विकास नाईक यांनी रस्ता सुरक्षेचे महत्त्व स्पष्ट करताना, अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग अनिवार्य असल्याचे मत व्यक्त केले. हेल्मेट व सीट बेल्टचा वापर, वेगमर्यादेचे पालन आणि मद्यपान करून वाहन न चालवणे या मूलभूत नियमांचे काटेकोर पालन केल्यास अपघात टाळता येऊ शकतात, असा संदेश त्यांनी दिला.
रस्ता सुरक्षा ही केवळ यंत्रणांची जबाबदारी नसून ती समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचा ठाम संदेश देत या अभियानाची सांगता करण्यात आली.
