दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा औंध प्रतिनिधी- निहाल मणेर
औंध: आपल्या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या गायत्रीदेवींचे हात अधिक बळकट करण्यासाठी सर्व स्तरांतील नागरिकांनी त्यांना सक्रिय साथ द्यावी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व उमेदवार विजयी करावेत, असे कळकळीचे आवाहन माजी समाजकल्याण सभापती शिवाजीराव सर्वगोड यांनी केले.
चौकीचा आंबा येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी युवा नेते योगेश फडतरे, बाजार समितीचे संचालक सुनील फडतरे, उपसरपंच सतीश जाधव, संताजी भोसले, कमलाकर निकम, सागर सावंत, हिम्मत फडतरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवाजीराव सर्वगोड पुढे म्हणाले की, गायत्रीदेवींचे सामाजिक, शैक्षणिक तसेच महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय आहे. समाजातील दुर्बल व वंचित घटकांसाठी त्यांनी सातत्याने भरीव काम केले असून त्यांच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता व प्रामाणिकपणा स्पष्टपणे दिसून येतो. महिलांचे प्रश्न, युवकांचे प्रश्न, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक न्याय यांसाठी त्यांनी कायम आवाज उठवला आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक गरजू कुटुंबांना न्याय मिळाला असून समाजात सकारात्मक परिवर्तन घडत असल्याचे चित्र दिसत आहे. आज समाजाला दूरदृष्टी असलेले, लोकाभिमुख आणि संघर्षातून घडलेले नेतृत्व आवश्यक आहे. गायत्रीदेवी हे असेच नेतृत्व असून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे ही काळाची गरज आहे. त्यांच्या माध्यमातून समाजाच्या अपेक्षा निश्चितच पूर्ण होतील, असा विश्वासही सर्वगोड यांनी व्यक्त केला.
यावेळी त्यांनी जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार मनीषा फडतरे, औंध गणाचे उमेदवार शुभम शिंदे तसेच सिद्धेश्वर कुरोली गणाचे उमेदवार मनोज देशमुख यांना विक्रमी मतांनी विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करावे, असेही आवाहन केले. कार्यक्रमास उपस्थित नागरिकांनी गायत्रीदेवींना जाहीर पाठिंबा दर्शवित त्यांच्या कार्याचे मनापासून कौतुक केले. समाजहितासाठी सुरू असलेल्या त्यांच्या उपक्रमांना भविष्यात अधिक व्यापक स्वरूप देण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला. विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते.
चौकट :
आजपर्यंत गायत्रीदेवींनी आपल्यासाठी साथ दिली, आता आपली वेळ
समाजातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न असोत, महिलांचे हक्क असोत किंवा दुर्बल घटकांसाठीचा लढा असो, गायत्रीदेवींनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. अडचणीच्या काळात अनेकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. कोणताही भेदभाव न करता समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन त्यांनी काम केले आहे. आज त्याच गायत्रीदेवींना आपल्या पाठबळाची गरज आहे. त्यांच्या कार्याला अधिक बळ देण्यासाठी, त्यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवण्यासाठी आणि समाजहिताच्या या प्रवासात सहभागी होण्यासाठी आता सर्वांनी एकत्र येण्याची वेळ आली आहे. त्यांनी समाजासाठी दिलेल्या योगदानाची परतफेड करण्याची हीच योग्य संधी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
