दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा औंध प्रतिनिधी- निहाल मणेर
औंध :
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद गट औंधच्या उमेदवार मनीषा फडतरे व औंध गणाचे उमेदवार शुभम शिंदे यांच्या प्रचारार्थ औंध येथे कोपरा सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या नेत्या गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या संख्येने कार्यकर्ते, मित्र पक्षांचे पदाधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते.
यावेळी जनतेशी संवाद साधताना गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी अत्यंत भावूक झाल्या. त्यांनी भरल्या डोळ्यांनी सांगितले की, “गेल्या २७ वर्षांपासून मी माझं संपूर्ण आयुष्य तुमच्यासाठी दिलं आहे. ऊन, पाऊस, आजार, अडचणी काहीही असो… तुमच्या सेवेत कधीच मागे हटले नाही. रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण, योजना जे जे शक्य होतं ते मी प्रामाणिकपणे केलं. आज ही निवडणूक म्हणजे माझ्या सेवेला तुमच्याकडून मिळणारे बक्षीस आहे. एकदा मनापासून साथ द्या, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी त्यांनी दिवंगत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची आठवण करून देताना सांगितले की, “आज अजितदादा आपल्यात नाहीत, ही आपल्या सर्वांसाठी मोठी पोकळी आहे. मात्र त्यांनी पाहिलेली स्वप्ने, त्यांची दूरदृष्टी आणि विकासाचे ध्येय आपण सर्वांनी पुढे घेऊन जायची आहे. त्यांच्या विचारांवर चालत हा भाग अधिक सक्षम, समृद्ध आणि विकसित करणे हेच आपले कर्तव्य आहे,” असे भावनिक शब्दांत त्यांनी सांगितले.
त्यांच्या या भावनिक शब्दात सभास्थळी उपस्थित अनेक नागरिक भावूक झाले. अनेकांच्या डोळ्यांत पाणी तर अनेकांच्या चेहऱ्यावर भावनिक प्रतिक्रिया दिसून आल्या.
सभेत उपस्थित उमेदवार मनीषा फडतरे व शुभम शिंदे यांनीही आपले मनोगत व्यक्त करत सांगितले की, या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी, गोरगरीब जनतेसाठी, आरोग्य सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते व इतर मूलभूत गरजांसाठी आम्ही अहोरात्र काम करू. जनतेच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी हणमंतराव शिंदे यांनी बोलताना सांगितले की, “औंध गावचा विकास आता नव्या दिशेने जात आहे. येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण येथे उपलब्ध होणार आहे. सध्या केजी ते पीजीपर्यंतचे शिक्षण येथे मिळत असले तरी, उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना पुणे-मुंबईसारख्या शहरांमध्ये जावे लागते. मात्र येणाऱ्या काळात हेच उच्च दर्जाचे शिक्षण औंधमध्येच देण्याचे दादांचे स्वप्न गायत्री देवी पंतप्रतिनिधी यांच्या माध्यमातून पूर्णत्वास जाणार आहे. तसेच अंतर्गत रस्ते व २४ तास पाणीपुरवठा योजना लवकरच सुरू होणार आहेत,” असे त्यांनी सांगितले.
कुरोली सिद्धेश्वर गणातून उमेदवार असलेले मनोज देशमुख यांनी बोलताना सांगितले की, “गायत्रीदेवी कोणासाठी आणि कशासाठी ही निवडणूक लढवत आहेत, हे प्रत्येक नागरिकांनी आत्मपरीक्षण करून पाहावे,” असे आवाहन त्यांनी केले.माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी बोलताना सांगितले की
गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या नेतृत्वाखाली औंध व परिसरात कोट्यवधी रुपयांची विकासकामे झाली असून, रस्ते, पाणी योजना, शिक्षण सुविधा, आरोग्य सेवा यामुळे परिसराचा चेहरामोहरा बदलला आहे. सामान्य माणसाच्या सुख-दुःखात कायम उभी राहणारी नेत्या म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
या भावनिक सभेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना मोठे बळ मिळाले असून, जनतेचा कौल आता स्पष्टपणे त्यांच्या बाजूने झुकत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
