दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी प्रताप नागरे
वाशिम, दि. ९ फेब्रुवारी
वाशिम शहरातील पंचशील नगर परिसरात देशी बनावटीची पिस्तूल बाळगून फिरणाऱ्या एका तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाडसी कारवाई करत रंगेहाथ अटक केली. या कारवाईत आरोपीकडून एक देशी बनावटीची स्टीलची पिस्तूल तसेच मॅगझिनमध्ये ठेवलेले दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंचशील नगर परिसरात एक व्यक्ती पिस्तूल घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक प्रदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करून परिसरात सापळा रचण्यात आला. महादेव मंदिराजवळ संशयास्पद हालचाली करत उभा असलेल्या तरुणाला पोलिसांनी पकडले. अंगझडती घेतली असता त्याच्याकडून देशी बनावटीची पिस्तूल व दोन जिवंत राऊंड आढळून आले.
चौकशीत आरोपीने आपले नाव पवन चिंतामण जोरेवार (वय २२, रा. पंचशील नगर, वाशिम) असे सांगितले असून पुढील कारवाईसाठी त्याला वाशिम शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. संबंधित शस्त्र त्याने कुठून व कोणाकडून मिळवले, तसेच त्यामागील उद्देश काय होता याचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
