दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी गंगाखेड/प्रेम सावंत
गंगाखेड: देवदर्शनासाठी उज्जैनकडे निघालेल्या गंगाखेड येथील पाच मित्रांच्या कारला जिंतूर शहराजवळील अकोली पुलावर भीषण अपघात झाला. या दुर्दैवी घटनेत चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. ही घटना बुधवार, दि. 12 फेब्रुवारी 2026 रोजी मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, गंगाखेड येथील पाच मित्र एर्टिगा (क्रमांक एमएच 14 केएफ 2790) या कारमधून उज्जैन येथे देवदर्शनासाठी निघाले होते. जिंतूर शहरापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर असलेल्या अकोली पुलाजवळ पोहोचताच चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि कार पुलाच्या कठड्यावर जोरदार आदळली. अपघात इतका भीषण होता की, चार जणांचा जागीच मृत्यू झाला.
मृतांमध्ये रोहन संजय राठोड (वय 26), कृष्णा गुट्टे (वय 28), बालाजी आश्रोबा आवटे (वय 21) आणि बालाप्रसाद उत्तमराव घोरपडे (वय 30) हे सर्व गंगाखेड येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे.
या अपघातात गोपाळ गणेश रोकडे (वय 25, रा. गंगाखेड) हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला प्रथम जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी परभणी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे गंगाखेड शहरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
