ठाणे जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी, विकी जाधव
बदलापूर – बदलापूर–कर्जत महामार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ढवळेपाडा ते डोणे या दरम्यान स्पीड ब्रेकर व इतर सुरक्षा उपाययोजना नसल्याने प्रवास करताना नागरिकांना जीव धोक्यात घालावा लागत असल्याची तक्रार स्थानिकांकडून करण्यात येत होती. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस कार्यवाही होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली होती.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जयेश केवणे यांनी सातत्याने पाठपुरावा करून प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यांच्या प्रयत्नांनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने कारवाई करत आवश्यक काम हाती घेतले.
सार्वजनिक बांधकाम विभाग ठाणे येथील कार्यकारी अभियंता श्री. कांबळे, सार्वजनिक बांधकाम विभाग उल्हासनगर येथील उपअभियंता श्री. मानकर तसेच सहअभियंता श्री. जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ७ फेब्रुवारी २०२६ रोजी दिवसभर काम करून उर्वरित काम रात्री सुमारे ९.३० वाजेपर्यंत पूर्ण करण्यात आले.
मुख्यमंत्री सचिवालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग ठाणे व उल्हासनगर यांच्या माध्यमातून ढवळेपाडा, ढवळेगाव, वांगणी व डोणे या अपघातप्रवण ठिकाणी डांबरी स्पीड ब्रेकर बसविण्यात आले आहेत. या उपाययोजनांमुळे भविष्यातील अपघातांवर नियंत्रण मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
या महत्त्वपूर्ण कामाबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.




