ठाणे जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी, विकी जाधव
वज्रेश्वरी (दि. १२ फेब्रुवारी २०२६) — वज्रेश्वरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आज हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषध उपचार मोहिमेचा शुभारंभ उत्साहात पार पडला. या मोहिमेचा शुभारंभ वज्रेश्वरी ग्रुप वि.का.से. सोसायटीच्या संचालिका श्रीमती सरस्वती परशुराम पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला, तर पत्रकार प्रशांत देशमुख यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाला डॉ. श्रुती मंचिकटला, पत्रकार प्रशांत देशमुख, मल्टीपर्पज वर्कर, आशा सेविका, आरोग्य केंद्रातील डॉक्टर व कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. श्रुती मंचिकटला यांनी हत्तीरोग प्रतिबंधासाठी दिल्या जाणाऱ्या गोळ्यांचे महत्त्व सविस्तरपणे सांगितले. नियमित औषध सेवन केल्यास हत्तीरोगावर प्रभावी नियंत्रण मिळवता येते, असे त्यांनी नमूद केले.
तसेच श्रीमती सरस्वती परशुराम पाटील यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, आरोग्य केंद्राच्या परिसरातील गावांमध्ये डॉक्टर किंवा आरोग्य सेवक घरोघरी जाऊन औषधे देणार आहेत. नागरिकांनी आपल्या मनातील शंका विचारून औषधोपचाराचा लाभ घ्यावा आणि हत्तीरोगापासून सुरक्षित राहावे.
ही मोहीम यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभागाने नागरिकांच्या सहकार्याचे आवाहन केले आहे.

