अमरावती (प्रतिनिधी):संजय सरवटकर
👉 पैशाच्या वादातून कट रचून हत्या
👉 पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळला
👉 २४ तासांत गुन्हा उघड; ५.७० लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलीस अधीक्षक कार्यालय, अमरावती ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली पथ्रोट पोलिसांनी जहानपूर शेतशिवारात आढळलेल्या अर्धवट जळालेल्या अनोळखी मृतदेह प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत छडा लावत सहा आरोपींसह एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले आहे. गुन्ह्यात वापरलेली पांढऱ्या रंगाची महिंद्रा XUV 500 व सात मोबाईल असा एकूण ५ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कॅनलमध्ये जळालेल्या अवस्थेत मृतदेह
दिनांक ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ग्राम वाघडोह येथील पोलीस पाटील यांनी वाघडोह–खोडगाव रोडवरील मारुती जहानपूर शेतशिवारातील धरणाच्या कॅनलमध्ये जळालेल्या अवस्थेत मृतदेह असल्याची माहिती दिली. त्यानुसार पथ्रोट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता कॅनलमध्ये अज्ञात इसमाचा जळालेला मृतदेह आढळला. जवळच चारचाकी वाहनाच्या टायरच्या खुणा दिसून आल्या.
या प्रकरणी पथ्रोट पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक. ३२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०३(१), २३८ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.
तांत्रिक तपासातून आरोपींचा माग काढला
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन विशेष पथके गठीत करण्यात आली. तांत्रिक पुरावे व गोपनीय माहितीच्या आधारे अंजनगाव सुर्जी येथील पद्मश्री हॉटेलचा मालक शुभम रॉय संशयाच्या भोवऱ्यात आला. कसून चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
तपासात उघड झाले की, मृतक शेख शाहरुख शेख रऊफ (राहणार आर्वी, जिल्हा वर्धा) याचा पैशाच्या वादातून प्रशांत महाजन यांच्याशी वाद झाला होता. त्यानंतर प्रशांत महाजन, त्यांचा मुलगा टिकेश महाजन व अली अजगर यांनी कट रचून शाहरुख याला गावाबाहेर बोलावले. तेथे त्याची मारहाण करून हत्या करण्यात आली.
यानंतर मृतदेह चारचाकी वाहनातून लेहगाव (तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती) येथे नेण्यात आला. तेथून शुभम रॉय याने आपल्या XUV 500 गाडीतून मृतदेह जहानपूर शेतशिवारातील शहानूर धरणाच्या कालव्यात नेऊन साथीदारांच्या मदतीने जाळल्याचे उघड झाले.
अटक आरोपी टिकेश प्रशांत महाजन (वय २८, राहणार गणपती वॉर्ड, आर्वी जि. वर्धा)
प्रशांत हरीचंद्र महाजन (वय ५९, राहणार. गणपती वॉर्ड, आर्वी जि. वर्धा)
शुभम मोहनलाल रॉय (वय २८, राहणार बुधवारा, अंजनगाव सुर्जी)
अली अजगर सब्दर हुसेन (वय २८, राहणार जाजूवाडी, आर्वी जि. वर्धा)
हर्षीत प्रकाश गौर (वय १९, राहणार भोईपुरा, अंजनगाव सुर्जी)
निखील दीपचंद गौर (वय ३२, राहणार भोईपुरा, अंजनगाव सुर्जी)
तसेच एका विधीसंघर्षित बालकाचा सहभाग असल्याचे समोर आले आहे.
ही कारवाई अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, पथ्रोट, अंजनगाव सुर्जी व सायबर पथकाच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आली. पुढील तपास पथ्रोट पोलीस करीत आहेत.
👉 पैशाच्या वादातून कट रचून हत्या
👉 पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळला
👉 २४ तासांत गुन्हा उघड; ५.७० लाखांचा मुद्देमाल जप्त
