दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी प्रताप नागरे
वाशिम, दि. १३ फेब्रुवारी
सार्वजनिक आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या औषधांच्या अनियमित विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने अनसिंग येथे मोठी धडक कारवाई करत दोन गंभीर प्रकरणे उघडकीस आणली आहेत. गर्भपातासंबंधित औषधे वैध वैद्यकीय प्रिस्क्रिप्शनशिवाय विक्री करणे तसेच कामोत्तेजक ऍलोपॅथिक औषधांचा बेकायदेशीर साठा ठेवणे या प्रकारांमुळे आरोग्य व्यवस्थेतील शिस्तभंग पुन्हा एकदा समोर आला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या बेटी बचाव अभियान तसेच गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र (लिंग निवड प्रतिबंध) अधिनियम, १९९४ च्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन, वाशिम यांनी जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय वाशिम यांच्या सहकार्याने ही कारवाई केली. गोपनीय माहितीच्या आधारे अनसिंग येथील एका मेडिकल स्टोअरवर डमी ग्राहक पाठविण्यात आला असता कोणतेही वैध प्रिस्क्रिप्शन न पाहता गर्भपात औषधांची विक्री होत असल्याचे स्पष्ट झाले. तपासणीदरम्यान संबंधित औषधांचा साठा मिळून आला, मात्र खरेदी-विक्रीसंदर्भातील कोणतीही वैध नोंद अथवा पावती उपलब्ध नसल्याने तो पंचनामाद्वारे जप्त करण्यात आला.
याच कारवाईदरम्यान सहाय्यक आयुक्त (औषधे) यांच्या नेतृत्वाखालील पथकाने खडसिंगी-अनसिंग परिसरात तपासणी केली असता वेग्रा-१०० मि.ग्रॅ. या कामोत्तेजक औषधांचा मोठ्या प्रमाणात अवैध साठा आढळून आला. एकूण २५३ पट्ट्या (प्रत्येकी चार गोळ्या) असा सुमारे २० हजार ४४८ रुपयांचा साठा कोणत्याही वैध औषध विक्री परवान्याशिवाय ठेवण्यात आल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले असून तोही जप्त करण्यात आला आहे.
गर्भपात औषधांची विनाप्रिस्क्रिप्शन विक्री आणि बेकायदेशीर औषध साठा हे सार्वजनिक आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणारे गुन्हे असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. संबंधितांविरुद्ध औषधे व सौंदर्यप्रसाधने अधिनियम, १९४० तसेच पीसीपीएनडीटी अधिनियमांतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार असून स्त्री भ्रूणहत्या, लिंग निवड आणि अवैध औषध व्यवहारांविरोधात प्रशासन शून्य सहनशीलतेचे धोरण कायम ठेवणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
आरोग्य क्षेत्रातील अशा बेकायदेशीर व्यवहारांवर कठोर कारवाई होत असल्याने औषध विक्रेत्यांनी नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचा संदेश या कारवाईतून स्पष्टपणे दिला गेला आहे.
