दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी गंगाखेड/प्रेम सावंत
गंगाखेड:मणियार डायग्नोस्टीक सेंटर व इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA परभणी) यांच्या संयुक्त विद्यमाने १५ फेब्रुवारी २०२६ (रविवार) रोजी परभणी जिल्हा विभाग तसेच जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड व नांदेड विभागांतील डॉक्टरांच्या मुलांसाठी भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
दि. १५ फेब्रुवारी रोजी पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला संजय (बंडू) जाधव यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच डॉ. कालिदास चौधरी (अध्यक्ष, IMA परभणी), डॉ. रामेश्वर नाईक (अध्यक्ष, परभणी अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटी) व ज्ञानेश्वर नाटकर (अध्यक्ष, श्री. ज्ञानेश्वर चित्रकला महाविद्यालय, परभणी) यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
या स्पर्धेत डाॅ. के. पी. गारोळे एज्युकेशन सेंटर येथील इयत्ता नववीतील कु. आर्या किशन गारोळे हिने १३ ते १८ वर्षे वयोगटात प्रथम क्रमांक पटकावत घवघवीत यश संपादन केले. तसेच गंगाखेड येथील कु. गीत आनंद चांडक हिने ३ ते ८ वर्षे वयोगटात प्रथम पारितोषिक मिळविले.
विजेत्यांच्या उत्कृष्ट कलाकृतींचे खासदार संजय (बंडू) जाधव यांनी मनापासून कौतुक करत त्यांच्या कलागुणांचे अभिनंदन केले. कु. आर्या हिच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून तिच्या या यशामुळे परभणी जिल्ह्याचे नाव उंचावले आहे.
पालक, शिक्षक तसेच वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांनी आर्याच्या या यशाबद्दल आनंद व्यक्त केला असून भविष्यातही ती अशाच प्रकारे उज्ज्वल यश संपादन करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
