नंदकिशोर शिरसोले…
जळगाव जामोद शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे १४ फेब्रुवारी रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची एका माथेफिरू तरुणाने विटंबना केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे शहरासह संपूर्ण तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अवघ्या चार तासांत आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक नागेश खाडे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपीविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत सोनाळा गावातील ग्रामस्थ व व्यापारी वर्गाने गाव कडकडीत बंद ठेवला. आरोपीसोबत असलेल्या सहकाऱ्यांनाही तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली.
दि. १७ फेब्रुवारी (मंगळवार) रोजी भीम क्रांती नवयुवक मंडळाच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला. गावातील नागरिकांनी शांततेचे आवाहन करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
