दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मंनधरणे
देगलूर तालुक्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी डॉ. पूजा गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार, प्रा. रवींद्र चव्हाण, नांदेड जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष मा.आ. हनमंतराव पाटील बेटमोगरेकर, रामदास पाटील सुमठाणकर यांच्या आदेशाने माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरसेटवार व रामदास पाटील सुमठाणकर यांच्या हस्ते डॉक्टर पूजा गायकवाड यांना नियुक्त पत्र देण्यात आले. त्यांच्या निवडीमुळे तालुक्यातील काँग्रेस महिला आघाडीमध्ये नवचैतन्य संचारले असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि आत्मविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.डॉ. पूजा गायकवाड या सामाजिक, शैक्षणिक आणि संघटनात्मक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या नेतृत्व म्हणून ओळखल्या जातात. महिला सक्षमीकरण, समाजप्रबोधन, आरोग्य जनजागृती तसेच विविध सामाजिक उपक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. तळागाळातील महिलांशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम त्यांनी सातत्याने केले आहे. त्यामुळे त्यांच्या निवडीचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात येत आहे. काँग्रेस पक्षाने महिलांना नेतृत्वाच्या मुख्य प्रवाहात स्थान देण्याचा निर्धार व्यक्त केला असून महिला आघाडीच्या माध्यमातून गावोगावी संघटन अधिक मजबूत करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. आगामी काळात महिला बचतगट, युवक-युवती संवाद, सामाजिक प्रश्नांवरील जनजागृती मोहीम आणि पक्षाच्या धोरणांचा प्रसार या माध्यमातून महिला आघाडी सक्रिय भूमिका बजावणार आहे.
डॉ. पूजा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली देगलूर तालुक्यातील महिला आघाडी नव्या जोमाने कार्यरत होईल, असा विश्वास पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. संघटनात्मक एकजूट, सामाजिक बांधिलकी आणि विकासाभिमुख दृष्टिकोन या तत्त्वांवर महिला आघाडीची वाटचाल राहील, असे संकेत देण्यात आले आहेत. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. देगलूर तालुक्यात काँग्रेस पक्ष अधिक सक्षम आणि संघटित करण्यामध्ये महिला आघाडीची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.यावेळी देगलूर तालुका अध्यक्ष विष्णुकांत पाटील शेकापुरकर, डॉक्टर प्रेमचंद तसेच अनेक काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते
महिला सक्षम बनल्या तरच देशाची प्रगती होईल. त्यासाठी महिला सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात सक्षम होणे गरजेचे आहे. त्यामुळेच काँग्रेसने नेहमीच महिलांना ताकद देण्याचे काम केले असून पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवला त्यासाठी मी नेहमी महिला सक्षमीकरणासाठी कटिबध्द आहे,…
डॉ. पूजा गायकवाड तालुका महिला अध्यक्ष काँग्रेस
