भारतीय उच्चायुक्तांनी घेतली पंतप्रधान रहमान यांची भेट…
भारताला बांगलादेशबरोबर पुन्हा निकटचे संबंध प्रस्थापित करायचे आहेत. बांगलादेशात नियुक्त झालेला भारताचे उच्चायुक्त प्रणव वर्मा यांनी बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांची अनौपचारिक भेट घेऊन ही माहिती दिली आहे.
वर्मा आणि तारिक रहमान यांनी द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला आणि दोन्ही देशांच्या जनतेमधील थेट संपर्क, राष्ट्रीय विकासासाठी प्राधान्याच्या मुद्द्यांवर चर्चा झाली, असे भारताच्या उच्चायुक्तालयाने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
बांगलादेशात फेब्रुवारी महिन्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीला निर्विवाद बहुमत मिळाल्यानंतर आणि तारिक रहमान बांगलादेशचे पंतप्रधान झाल्यानंतर दोन्ही देशांनी एकमेकांबरोबरची जवळीक वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
बांगलादेशात मुख्य सल्लागार डॉ. मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकार सत्तेत असताना भारत आणि बांगलादेशमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता. आता हे संबंध सुधारण्याकडे दोन्ही देशांचा कल आहे. भौगोलिक जवळीक ही द्विपक्षीय संबंध सुधारण्याची संधी आहे.
आर्थिक संबंध, कनेक्टिव्हीटी अधिक सक्षम करायला हवी. सांस्कृतिक आणि लोकांमधील प्रत्यक्ष संबंधही वाढवायला हवेत, असेही भारताचे उच्चायुक्त प्रणव वर्मा यांनी सांगितले. सकारात्मक, विधायक, भविष्याला अनुकूल दृष्टीकोन आणि परस्परांचे हित, परस्परांच्या फायद्याचा दृष्टिकोन ठेवून एकत्र काम करण्याची भारताची इच्छा असल्याचेही वर्मा यांनी रहमान यांना सांगितले.
