बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत आता रंगत वाढली असून बिनविरोधची शक्यता पूर्णतः संपुष्टात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी सोमवारी (६ एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल केला.
त्यानंतर काँग्रेसकडून आकाश मोरे यांनीही अर्ज भरत थेट लढतीचे संकेत दिले.
महाविकास आघाडीतील काँग्रेस हा प्रमुख घटक पक्ष असतानाही प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ मोरेंच्या अर्जावेळी अनुपस्थित राहिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. सुरुवातीपासून बारामतीत काँग्रेसने उमेदवार द्यावा, यासाठी सपकाळ आग्रही होते. त्यांनी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनाही याबाबत पटवून दिले होते. अखेर काँग्रेसने आक्रमक प्रतिमा असलेल्या आकाश मोरे यांना उमेदवारी दिली.
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ अनुपस्थित राहण्याचे कारण –
दरम्यान, सपकाळ यांच्या अनुपस्थितीमागे केरळ विधानसभा निवडणुकीतील प्रचाराची व्यस्तता कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेसचे अनेक नेते सध्या दक्षिणेतील निवडणुकांमध्ये प्रचारासाठी तैनात आहेत. मात्र, ऐनवेळी बारामती दौरा रद्द झाल्याने विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
याच पार्श्वभूमीवर, सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी सपकाळ यांना फोन करून पाठिंब्याची विनंती केल्याची चर्चा रंगली होती. मात्र काँग्रेसने उमेदवार जाहीर करत मोरे यांना रिंगणात उतरवले आणि बिनविरोधची शक्यता फोल ठरली.
लक्ष्मण हाकेंची माघार –
दरम्यान, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सहानुभूतीची लाट लक्षात घेऊन आणि राज्यातील वरिष्ठ नेत्यांच्या विनंतीनंतर माघार घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार धनंजय मुंडे तसेच इतर नेत्यांनी संपर्क साधल्यानंतर आपण निर्णय घेतल्याचे हाके यांनी सांगितले.
एकूणच, बारामतीत आता राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध काँग्रेस अशी थेट आणि अटीतटीची लढत रंगण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत.
