दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मंनधरणे
देगलूर तालुक्यात सामाजिक कार्यासाठी परिचित असलेल्या खुशी सेवाभावी संस्थेने सेवा आता तालुक्याबाहेरही विस्तारली असून मुखेड तालुक्यातील श्रावण बाळ मंदिरात आयोजित सात दिवसीय रामचरितमानस कथेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्रावण बाळ मंदिरात महासत्तेचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या संपूर्ण सप्ताहात रामचरितमानस कथेसाठी खुशी सेवाभावी संस्थेने पुढाकार घेतला आहे.
सात दिवस चालणाऱ्या या धार्मिक सोहळ्यात दररोज हजारोंच्या संख्येने भाविक मंदिरात उपस्थित राहत असून भक्तिमय वातावरणात रामचरितमानस कथा श्रवण करत आहेत. सकाळपासून सायंकाळपर्यंत मंदिर परिसरात धार्मिक उत्साह, भजन-कीर्तन आणि रामनामाच्या गजराने वातावरण भारावून गेले आहे. स्थानिक नागरिकांसह परिसरातील गावांमधूनही मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित राहत आहेत.
खुशी सेवाभावी संस्थेने संपूर्ण सप्ताहाचे योगदान दिले व श्रावण बाळ मंदिराचे सभासद यांनी नियोजनबद्ध आयोजन करून कथेला यशस्वी स्वरूप दिले आहे. संस्थेच्या या कार्यामुळे मुखेड तालुक्यात सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. धार्मिक व सामाजिक उपक्रमांमधील सातत्यपूर्ण योगदानामुळे संस्थेची ओळख अधिक दृढ झाली आहे.
या पार्श्वभूमीवर श्रावण बाळ मंदिराच्या सभासदांनी खुशी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष एकनाथ उर्फ बबलू टेकाळे आणि त्यांच्या परिवाराला विशेष निमंत्रण देऊन सन्मानित केले. त्यांच्या हस्ते मंदिरात आरती करण्यात आली तसेच शाल-श्रीफळ देऊन भव्य स्वागत करण्यात आले. उपस्थित भाविकांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे अभिनंदन केले.
स्वागत समारंभानंतर एकनाथ बबलू टेकाळे यांनी भाविकांना मोतीचूर लाडूंचा प्रसाद वाटप केला. प्रसाद वितरणाच्या वेळी भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
खुशी सेवाभावी संस्थेच्या या उपक्रमामुळे धार्मिक आणि सामाजिक बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण समोर आले असून भविष्यातही अशाच प्रकारे समाजसेवेचे कार्य सुरू ठेवण्याचा निर्धार संस्थेने व्यक्त केला आहे.
