राज्यात सध्या नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण चांगलेच गाजत आहे. या प्रकरणात काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सीडीआर (CDR) अहवालाचा हवाला देत अशोक खरातचे काही राजकीय नेत्यांशी संपर्क असल्याचे सांगत नावे जाहीर केली.
यामध्ये रुपाली चाकणकर, एकनाथ शिंदे, चंद्रकांत पाटील आणि सुनील तटकरे यांच्यासोबत अनेकदा अशोक खरातचे बोलणे झाले असल्याचा दावा केला. यावरून शिवसेना उबाठाच्या सुषमा अंधारे यांनी सीडीआर (CDR) अहवाल हे त्यांना कसे मिळाले? यामध्ये भाजपची नावे का नाहीत? असा सवाल उपस्थित केला. पण, या सर्व आरोपांवर अंजली दमानिया यांनी प्रत्युत्तर दिली आहे.
सोमवारी (6 एप्रिल) पत्रकार परिषद घेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी स्पष्टीकरण दिले. यावेळी त्यांना भावना अनावर होत आपला संताप व्यक्त केला. “माझ्याबद्दल गेले काही दिवस चर्चा सुरु आहे, अटकेचीही मागणी केली जात आहे. माझ्याकडे सीडीआर (CDR) कसा आला? हे सांगणार आहे. मी रॉ ची एजंट आहे का? असे बोलले जात आहे.” असे म्हणत त्यांनी स्पष्टीकरण देण्यास सुरुवात केली. “मला 1 तारखेला 12 वाजता एका व्यक्तीचा मेसेज आला की मला खरातची माहिती द्यायची आहे. त्याचा कॉल मी घेतला आणि माझ्याकडे खरातचा सीडीआर आहे असे त्याने सांगितले. दुसऱ्या एका नंबरवरुन त्याने मला सीडीआरची एक्सेल शीट पाठवली. सदर व्यक्ती प्रायवेट डिटेक्टीव होती, त्याची कंपनी होती. या व्यक्तीची कंपनी आणि त्याच्या माहितीची तपासणी केली आणि ती योग्य होती. एक्सेल शीटवरील माहिती मी क्लाऊड ऍपवर टाकली त्यामधून मला फोन नंबर कोणाचे होते? हे समजले. मी ही माहिती डीजी दाते यांना आणि यंत्रणांना पाठवली आहे’ अशी स्पष्टोक्ती त्यांनी केली.
विरोधकांच्या टीकेवर हल्लाबोल
शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी दमानिया रॉच्या एजंट आहेत का? असा सवाल केला होता. तर, सुषमा अंधारे यांनीही गंभीर आरोप केले. यावर त्या म्हणाल्या की, “अशोक खरातच्या सोबत जेवढ्या लोकांचे फोटो आहेत, त्या सगळ्यांचे नंबर मी शोधले. इतकेच नाही तर मला माहीत होते की सगळ्यांचे माझ्यावर आरोप होतील. म्हणून सुरुवातीपासून कोणाकोणाचे शोध घेतले त्याचा सीडीआरचे जे रेकॉर्डिंग आहे ते सुद्धा मी देणार आहे. ज्यांचे नंबर या सीडीआरमध्ये मिळाले तेच समोर आणले. लगेच आरोप केले की यात भाजपचा एकही नाही. जो उठेल तो बोलतो. पण त्यांनी हे लक्षात ठेवावे की, आम्ही विषयांवर लढतो, फालतूचे राजकारण करत नाही.” असे म्हणत असताना त्यांना अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले.
“मी बोलले तर मी बाजू घेऊन बोलते. मिलिंद नार्वेकर यांचादेखील फोन नंबर त्यामध्ये आला. 8 वेळा फोनवर बोलणे झाले. त्याची तुम्ही चौकशी केली का? काय बोलता अंधारे बाई तुम्ही?” असे म्हणत दमानिया यांनी सुषमा अंधारे यांच्यावर निशाणा साधला. ” तुमचा विषय काय? लढायचे आहे कोणाच्या विरोधात? खरातच्या विरोधात. मी फक्त माझ्याकडे आलेली माहिती दिली. तर लगेच वर खाली व्हायला लागल्या. दमानिया बाई अमुक, दमानिया बाई तमुक. त्यांनी हे नाही केले, ते नाही केले. खड्ड्यात गेले तुमचे विचार, तुमच्या खिशात ठेवा” असे म्हणत प्रत्युत्तर दिले.
