सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीने राजकारण तापलं; शिंदेंचा मोठा दावा…
बारामतीत सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं असून, आगामी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज बारामती विधानसभा पोटनिवडणूक 2026 साठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
त्याआधी बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा मेळावा पार पडला, ज्यात महायुतीने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. या पोटनिवडणुकीला बिनविरोध करण्यासाठी महायुतीकडून प्रयत्न झाले होते. मात्र काँग्रेसने निवडणूक लढवण्याचा ठाम निर्णय घेतला असून, त्यांच्याकडून आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
त्यामुळे ही लढत आता अधिक रंगतदार होण्याची चिन्हं आहेत. दरम्यान, या मेळाव्यात बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना सूचक इशारा दिला. ते म्हणाले की, ही निवडणूक दुर्दैवाने लढवावी लागत आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण राज्य शोकसागरात बुडालं होतं. त्यांनी राज्याच्या अर्थकारभारासह विविध खात्यांची जबाबदारी अत्यंत सक्षमपणे सांभाळली. एक कुशल प्रशासक म्हणून त्यांची ओळख होती, असं शिंदेंनी नमूद केलं. शिंदे पुढे म्हणाले की, आपण मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि मी मिळून लाडकी बहीण योजनेसारखे मोठे निर्णय घेतले.
या योजनेचा आवाका आणि खर्च मोठा असताना देखील अजित पवारांनी अर्थमंत्री म्हणून अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ती राबवली. त्यामुळे त्यांच्या कार्याची छाप आज देखील राज्याच्या विकासात दिसून येते. अजित पवार यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी मोठी आहे, मात्र सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली आहे, असा विश्वास देखील शिंदेंनी यावेळी व्यक्त केला. मी, देवेंद्र फडणवीस आणि सुनेत्रा पवार मिळून राज्य पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत, असं देखील ते म्हणाले.
बारामतीत अजित पवारांनी उभारलेला विकासाचा पाय मजबूत असून, त्या कामांची साक्ष सुनेत्रा पवार आहेत. त्यामुळे येथील जनता महायुतीच्या उमेदवार म्हणून त्यांच्या पाठीशी उभी राहील, असा विश्वास देखील यावेळी त्यांनी व्यक्त केला. याचवेळी त्यांनी स्पष्ट केलं की, अनेक संघटनांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी आमची इच्छा होती. परंपरा जपण्याची जबाबदारी सर्वांची आहे, असं म्हणत त्यांनी विरोधकांना अप्रत्यक्ष आवाहन केलं.
तसेच, जर निवडणूक झालीच, तर अजित पवारांच्या कामाची पोचपावती सुनेत्रा पवार यांच्या भव्य विजयातून मिळेल, असा सूचक इशारा देखील एकनाथ शिंदे यांनी दिला. येऊनच बारामती पोटनिवडणूक आता प्रतिष्ठेची लढत बनण्याची चिन्हं स्पष्ट दिसत असून, येत्या काही दिवसांत राजकीय घडामोडींना आणखी वेग येण्याची शक्यता आहे.
