ठाणे जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी, विकी जाधव
कल्याण– सन २०२२-२३ या वर्षासाठी राबविण्यात आलेल्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत कोकण विभागातून जांभुळ ग्रामपंचायतीने उल्लेखनीय कामगिरी करत तृतीय क्रमांक पटकाविला आहे.
कोकण विभागातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांमधून झालेल्या स्पर्धेत जांभुळ ग्रामपंचायतीची निवड झाली. याबद्दल ग्रामपंचायतीस सन्मानचिन्ह व रु. ७.०० लाखांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.
हा सन्मान डॉ. विजय सूर्यवंशी (भा.प्र.से), कोकण विभागीय आयुक्त यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी माजी सरपंच श्री. परिक्षित हिराजी पिसाळ यांनी सरपंच म्हणून हा सन्मान स्वीकारण्याचे भाग्य लाभल्याची भावना व्यक्त केली. “या यशामागे जांभुळकरांचे मोलाचे सहकार्य आणि आशीर्वाद आहेत. ग्रामस्थांच्या एकजुटीमुळेच हे यश शक्य झाले. भविष्यातही असेच सहकार्य लाभावे व ग्रामपंचायतीने आणखी मोठे यश संपादन करावे,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
जांभुळ ग्रामपंचायतीच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण असून ग्रामस्थांकडून सर्व संबंधितांचे अभिनंदन करण्यात येत आहे.


