दैनिक चालू वार्ता – शिरूर प्रतिनिधी-इंद्रभान ओव्हाळ
( शिरूर,) : मौजे पिंपळसूटी येथील गट क्रमांक २७४ या जमिनीच्या मोजणीसाठी २९ फेब्रुवारी २०२५ रोजी ‘ अभिषेक मुकिंदा फराटे या शेतकऱ्याने अतितातडी’ स्वरूपाचा अर्ज सादर करूनही तब्बल एक वर्ष उलटून गेले तरी कोणतीही कार्यवाही न झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या संदर्भात संबंधित अर्जदाराने भूमी अभिलेख कार्यालयाकडे वारंवार पाठपुरावा केला. परंतु, अधिकार्यांकडून केवळ उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे.
सदर केलेला अर्ज हा ‘अतितातडी’ श्रेणीतील असतानाही अद्याप मोजणीची तारीख निश्चित झालेली नाही. तसेच अर्जाची सद्यस्थिती काय आहे, हे देखील प्रशासनाकडून स्पष्ट केले जात नाही. यामुळे संबंधित शेतकऱ्याला गेल्या वर्षभरापासून मानसिक व आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शासकीय कार्यालयातील या दिरंगाईमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
शेतकऱ्याच्या प्रमुख मागण्या:
अर्जाची सद्यस्थिती लेखी स्वरूपात कळवावी.
जमिनीच्या मोजणीसाठी निश्चित दिनांक जाहीर करावा.
संबंधित अधिकार्यांना तात्काळ आदेश देऊन मोजणीची प्रक्रिया पूर्ण करावी.
अतीतातडी मोजणीसाठी जास्तीचे शुल्क भरूनही जर वर्षभर प्रतीक्षा करावी लागत असेल, तर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता या प्रकरणात शिरूर तहसील प्रशासन किती तत्परतेने दखल घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
