जळगाव जामोद प्रतिनिधी विनोद वानखडे
सरकारी कार्यालयातील लालफितीचा कारभार आणि कर्मचाऱ्यांची मुजोरी एका ६७ वर्षीय वृद्धाच्या जीवावर बेतली आहे. दीड महिना हेलपाटे मारूनही ‘खरेदी नक्कल’ मिळत नसल्याने, हताश झालेल्या धोंडू केडूजी बाविस्कर यांनी चक्क तहसील कार्यालयातच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.जळगाव जामोद तहसील कार्यालयात सोमवारी एकच खळबळ उडाली. नांदुरा तालुक्यातील दिघी येथील ६७ वर्षीय धोंडू बाविस्कर १९८१ च्या एका जुन्या खरेदीखताच्या नक्कलेसाठी गेल्या २० नोव्हेंबरपासून कार्यालयाचे उंबरठे झिजवत होते. पण प्रत्येक वेळी त्यांना ‘उद्या या, परवा या’ अशी उडवाउडवीची उत्तरे मिळाली.धोंडू बाविस्कर यांचा आरोप आहे की, त्यांच्या जमिनीचे प्रकरण न्यायालयात सुरू आहे. केवळ विरोधी पक्षाला मदत करण्यासाठी तहसील कार्यालयातील कर्मचारी मुद्दाम ही नक्कल देण्यास टाळाटाळ करत होते. प्रशासकीय छळाला कंटाळून अखेर या वृद्ध शेतमजुराने टोकाचे पाऊल उचलले.विष प्राशन केल्यानंतर बाविस्कर यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, प्रकृती खालावल्याने त्यांना खामगाव आणि तिथून अकोला येथे हलवण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.”
“एकिकडे सरकार डिजिटल इंडिया आणि पारदर्शक कारभाराच्या गप्पा मारत असताना, एका साध्या कागदासाठी ६७ वर्षांच्या वृद्धाला जीव धोक्यात घालावा लागतो, हे प्रशासनाचे मोठे अपयश आहे. आता संपूर्ण तालुक्यातून सवाल विचारला जात आहे – तहसीलदार पवन पाटील या दोषी कर्मचाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करणार का? बाविस्कर यांना न्याय कधी मिळणार?”
——————–
बावस्कार हे इसम नांदुरा तालुक्यातील असून त्यांची शेती ही जळगाव तालुक्यातील होती त्या संदर्भात तात्कालीन तहसीलदारांनी त्यांच्या विरोधात निकाल दिला होता त्या निकालाच्या विरोधात त्यांनी अपील केले होते त्या अपीलाचा निकाल मागील महिन्यात लागला होता परंतु त्यांना त्या केस संदर्भात काही दस्तऐवज हवे होते त्याकरिता त्यांनी अर्ज दिला होता परंतु आमचे कार्यालय नवीन जागेत शिफ्ट झाल्यामुळे कागदपत्र शोधण्यास बराच वेळ निघून गेला त्यांना त्यांसंदर्भात आम्ही वेळोवेळी सांगितले होते परंतु त्यांनी आज येऊन टोकाचे पाऊल उचलले. त्यांनी दिलेल्या अर्जावर आतापर्यंत विलंब का झाला या संदर्भात चौकशी करून संबंधित दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल
-पवन पाटील, तहसीलदार, जळगाव जामोद
