दै.चालु वार्ता वृत्तसेवा उदगीर, प्रतिनिधी-अविनाश देवकते
लातूर (उदगीर) :उदगीर पंचायत समितीच्या देवर्जन गणातून अपक्ष म्हणून निवडून आलेले सदस्य चंद्रकांत कांबळे यांनी माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोडे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयामुळे पंचायत समितीतील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या संख्याबळात वाढ झाली आहे.
यावेळी आमदार संजय बनसोडे यांनी पक्षाची ध्येय-धोरणे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवून देवर्जन गणाचा सर्वांगीण विकास साधण्याचे आवाहन केले. विकासकामांमध्ये पारदर्शकता, गती आणि लोकसहभाग यांना प्राधान्य देण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
चंद्रकांत कांबळे यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह पक्षप्रवेश करताना सांगितले की, स्थानिक प्रश्नांच्या प्रभावी सोडवणुकीसाठी सक्षम नेतृत्व आणि ठोस धोरणांची आवश्यकता आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी आणि देवर्जन गणात मूलभूत सुविधांची उभारणी करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
या पक्षप्रवेशामुळे पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली असून आगामी काळात विकासकामांना अधिक गती मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रा. दिलीपकुमार मटके, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर बिरादार, तालुकाध्यक्ष बालाजी भोसले पाटील, तालुका कार्याध्यक्ष वसंतराव पाटील, माजी उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, कमलाकर फुले, पंचायत समिती सदस्य विकी भोसले, प्रा. शाम डावळे, ज्ञानेश्वर पाटील रावणगावकर, प्रा. शिवाजी देवनाळे, राजकुमार हुडगे, शुभम केंद्रे, लक्ष्मण कुंडगिर, गजानन बिरादार, विजय होनराव यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
