दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा अर्धापूर- प्रतिनिधी मन्मथ भुस्से.
अर्धापूर, दि. २८ फेब्रुवारी :
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त लॉर्ड बसवेश्वरा प्रायमरी इंग्लिश स्कूल येथे विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विज्ञान आणि शास्त्रीय संशोधनाच्या बळावर शास्त्रज्ञांनी मानवाचे जीवन अधिक सुखकर व समृद्ध केले आहे, असे प्रतिपादन अर्धापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष वैशाली प्रवीण देशमुख यांनी केले. त्या कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून बोलत होत्या.
याप्रसंगी शाळेत आयोजित विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन नगराध्यक्ष वैशाली देशमुख यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून माजी उपनगराध्यक्ष डॉ. पल्लवी विशाल लंगडे, महात्मा बसवेश्वर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शैलेजा शेटे, शाळेच्या मुख्याध्यापिका मंजुषा पाचंगे तसेच प्रेरणा जैस्वाल यांची प्रमुख उपस्थिती होती.
विज्ञान प्रदर्शनात शाळेतील एकूण ८२ विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक प्रयोग व प्रकल्प सादर केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाविन्यपूर्ण व उपयुक्त प्रयोगांचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. प्रत्येक वर्गातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक विनोद शिरसाट, देविदास कांबळे, सुजाता औंडेकर, शेख नसीम, पूजा पंडित, पूजा मोरे, सुनिता भिसे आणि वंदना कानोडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमास पालक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
