इगतपुरी प्रतिनिधी :- विकास पुणेकर
इगतपुरी :- इगतपुरी तालुक्यातील समाजकल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात अल्पवयीन विद्यार्थ्यांवर अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. दहावीमध्ये शिकणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी पाचवी ते सातवी इयत्तेत शिकणाऱ्या लहान मुलांना गुंगीच्या गोळ्या देऊन व दारू पाजून त्यांच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप पालकांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित वसतिगृहात राहणाऱ्या दहावीच्या आठ ते नऊ विद्यार्थ्यांनी पाचवी ते सातवीतील किमान सहा विद्यार्थ्यांवर वारंवार अत्याचार केल्याचे समोर आले आहे. यातील एका पीडित मुलाने घडलेला प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली.
घटनेची माहिती मिळताच संतप्त पालकांनी वसतिगृहात धाव घेत प्रशासनाकडे जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी केली. सुरुवातीला इगतपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोपही पालकांनी केला आहे. मात्र, वाढता तणाव लक्षात घेता पोलिसांनी अखेर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
या प्रकरणात अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार झाल्याने लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण कायदा (POCSO) तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गुंगीच्या गोळ्या देणे, मद्यप्राशन घडवून आणणे आणि अत्याचार करणे या संदर्भात गंभीर स्वरूपाचे कलम लागू होऊ शकतात.
दरम्यान, समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील देखरेख व्यवस्था, अधीक्षकांची जबाबदारी आणि सुरक्षेतील त्रुटी याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
