दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर
( पुणे ) वाघोली : वाढती गुन्हेगारी आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वाघोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध ठिकाणी नवीन पोलीस चौक्या स्थापन करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आल्याची माहिती वाघोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी दिली.यापूर्वी वाघोली गाव लोणीकंद ग्रामीण पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात येत होते. त्या काळात वाघोली येथे लोणीकंद पोलीस स्टेशनअंतर्गत पोलीस चौकी कार्यरत होती. मात्र वाघोली गावाचा पुणे महापालिकेत समावेश झाला. वाघोलीतील येथील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली. वाढते नागरीकरण आणि भौगोलिक विस्तार लक्षात घेता गुन्हेगारीच्या घटनांमध्येही वाढ होत असल्याने येथे स्वतंत्र वाघोली पोलीस ठाण्याची स्थापना करण्यात आली.
दरम्यान, परिसराचा वाढता विस्तार आणि नागरिकांची वाढती संख्या लक्षात घेऊन गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी वाघोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी वाघोलीतील महत्त्वाच्या ठिकाणी तीन नवीन पोलीस चौक्या स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवण्यात आला आहे.
प्रस्तावित प्रत्येक चौकीमध्ये एक सहाय्यक पोलीस निरीक्षक, एक उपपोलीस निरीक्षक, दोन पोलीस हवालदार आणि दोन पोलीस अंमलदार अशी मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना तक्रार नोंदविण्यासाठी थेट वाघोली पोलीस ठाण्यात जाण्याची गरज भासणार नसून संबंधित चौकीमध्येच तक्रार नोंदवता येणार आहे.
वाघोली गावठाण, बायफ रोड तसेच बीजेएस महाविद्यालयाजवळील बकोरी फाटा या तीन ठिकाणी पोलीस चौक्या उभारण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. या चौक्यांसाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध व्हावी यासाठी जागेची पाहणी करून संबंधित विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.
वाघोली परिसर झपाट्याने विकसित होत असून लोकसंख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नवीन पोलीस चौक्यांची गरज होती. पोलीस प्रशासनाने घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह असून निश्चितच नागरिकांसाठी दिलासादायक ठरेल.
– समीर भाडळे (माजी उपसरपंच, वाघोली)
वाघोली परिसराचा वेगाने होत असलेला विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम ठेवणे आवश्यक आहे. नागरिकांना तक्रार नोंदविण्यासाठी दूरवर जावे लागू नये आणि गुन्ह्यांवर तत्काळ नियंत्रण मिळवता यावे यासाठी नवीन पोलीस चौक्या सुरू करण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवला आहे.
– नंदकुमार गायकवाड (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाघोली)
