ठाणे-प्रतिनिधी-नागेश पवार
ठाणे (प्रतिनिधी): सध्या घरगुती गॅस सिलेंडर (LPG) बुकिंग करताना ग्राहकांना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गॅस बुकिंगच्या नेहमीच्या नंबरवर कॉल केल्यास ‘नंबर अस्तित्वात नाही’ किंवा कॉल अचानक कट होणे, असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे गॅस बुकिंगचे नंबर बदलले आहेत का, असा संभ्रम नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. मात्र, गॅस कंपन्यांनी कोणतेही नवीन नंबर जारी केलेले नसून, केवळ सर्व्हरमधील तांत्रिक बिघाड आणि दोन सिलेंडर बुकिंगमधील नियमांत झालेल्या नवीन बदलांमुळे ही अडचण येत असल्याचे समोर आले आहे.
कॉलिंग (IVRS) सिस्टीमद्वारे गॅस बुकिंग होत नसल्याने सर्वसामान्यांची मोठी गैरसोय होत आहे. परंतु, नागरिकांनी बुकिंग न होण्याच्या भीतीने घाबरून जाण्याची गरज नाही. कॉलिंग ऐवजी खालील सोप्या पर्यायी मार्गांनी तुम्ही घरबसल्या गॅस बुकिंग करू शकता:
१. व्हॉट्सॲप (WhatsApp) द्वारे बुकिंग:
तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून गॅस कंपनीच्या अधिकृत व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करून अवघ्या काही सेकंदात बुकिंग करता येते.
इंडेन गॅस (Indane): 7588888824 या नंबरवर ‘REFILL’ असा मेसेज करा.
एचपी गॅस (HP): 9222201122 या नंबरवर ‘Hi’ किंवा ‘Book’ असा मेसेज करा.
भारत गॅस (Bharat Gas): 1800224344 या नंबरवर ‘Hi’ असा मेसेज करा.
२. मिस्ड कॉल (Missed Call) सुविधा:
तुमच्या नोंदणीकृत नंबरवरून फक्त एक मिस्ड कॉल देऊनही बुकिंग होऊ शकते.
इंडेन गॅस: 8454955555
एचपी गॅस: 9493602222
३. ऑनलाईन पेमेंट ॲप्सचा वापर (UPI Apps):
गुगल पे (Google Pay), फोन पे (PhonePe), ॲमेझॉन पे (Amazon Pay) आणि पेटीएम (Paytm) यांसारख्या युपीआय ॲप्सवर ‘Pay Bills’ विभागात जाऊन ‘Cylinder Booking’ चा पर्याय निवडा. तिथे तुमचा गॅस प्रोव्हायडर निवडून तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा एलपीजी आयडी (LPG ID) टाकल्यास थेट बुकिंग आणि पेमेंट दोन्ही करता येते.
४. अधिकृत मोबाईल ॲप्स:
गॅस कंपन्यांच्या अधिकृत ॲप्सवरूनही (उदा. IndianOil One, HP Pay, Hello BPCL) सहज बुकिंग करता येते. या ॲप्सवर तुम्हाला बुकिंगचे स्टेटसही ट्रॅक करता येते.
सध्याच्या तांत्रिक समस्येवर गॅस कंपन्यांकडून काम सुरू असून, तोपर्यंत ग्राहकांनी अफवांवर विश्वास न ठेवता या डिजिटल आणि स्मार्ट पर्यायांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
