ठाणे जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी, विकी जाधव
बदलापूर : शहरातील विविध रस्त्यांवर उभारण्यात आलेले अनेक गतिरोधक हे तांत्रिक निकषांचे पालन न करता बांधले गेले असल्याने वाहनचालकांसाठी ते धोकादायक ठरत असल्याची बाब समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकार विकी कुंडलिक जाधव यांनी कुलगाव-बदलापूर नगरपरिषद यांच्याकडे ई-मेलद्वारे अधिकृत तक्रार दाखल केली असून शहरातील सर्व नियमबाह्य गतिरोधकांची तपासणी करून ते हटविण्याची मागणी केली आहे.
तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, बदलापूर शहरातील अनेक रस्त्यांवर उभारण्यात आलेले गतिरोधक हे उंची व रचनेच्या दृष्टीने प्रमाणापेक्षा जास्त असल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वार, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि गर्भवती महिलांसाठी हे गतिरोधक धोकादायक ठरत असून अपघाताची शक्यता वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या संदर्भात पत्रकार विकी जाधव यांनी Bombay High Court यांनी दिलेल्या
Suo Motu Writ Petition (PIL) No. 3 of 2005 – Kewal Semlani vs Commissioner, Municipal Corporation of Greater Mumbai या महत्त्वपूर्ण आदेशाचा उल्लेख करत नगरपरिषदेला त्याची प्रत देखील पाठवली आहे. न्यायालयाने या आदेशात राज्यातील सर्व गतिरोधक हे Indian Roads Congress (IRC) च्या मार्गदर्शक तत्वांनुसार असणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले असून नियमबाह्य गतिरोधक हटविण्याचे निर्देश दिले आहेत.
IRC च्या निकषांनुसार गतिरोधकांची उंची सुमारे १० सेंटीमीटर, रुंदी सुमारे ३.७ मीटर आणि गोलाई १७ मीटर असावी तसेच त्यावर काळे-पांढरे पट्टे, रिफ्लेक्टर किंवा ल्युमिनस रंग असणे आवश्यक आहे. मात्र शहरातील अनेक ठिकाणी हे निकष पाळले गेले नसल्याचे आढळून येत आहे.
पत्रकार विकी कुंडलिक जाधव यांनी नगरपरिषदेला केलेल्या तक्रारीत शहरातील सर्व गतिरोधकांचे सर्वेक्षण करून नियमबाह्य व धोकादायक गतिरोधक तात्काळ हटवावेत किंवा योग्य निकषांनुसार दुरुस्त करावेत, अशी मागणी केली आहे. तसेच भविष्यात गतिरोधक उभारण्यापूर्वी वाहतूक पोलिसांची परवानगी घेणे आणि IRC च्या नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
दरम्यान, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या तक्रारीवर नगरपरिषद प्रशासन कोणती कार्यवाही करते याकडे बदलापूरकरांचे लक्ष लागले आहे.

