दैनिक चालू वार्ता रिसोड शहर प्रतिनिधी -विजय जुंजारे
रिसोड | प्रतिनिधी
रिसोड शहरातील समर्थ नगर परिसरात मागील काही दिवसांपासून दूषित व गढूळ पाणीपुरवठा होत असल्याची गंभीर तक्रार समोर आली आहे. या संदर्भात प्रभाग क्र. ५ च्या नगरसेविका सौ. सुरेखा रवी दांदडे यांनी नगर परिषद प्रशासनाकडे लेखी निवेदन देत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, समर्थ नगर परिसरात नळाद्वारे येणारे पाणी दूषित असून त्यातून दुर्गंधी येत आहे तसेच पाण्यामध्ये घाण आढळत आहे. त्यामुळे हे पाणी पिण्यास व वापरासाठी अयोग्य ठरत आहे. परिणामी परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व महिला यांना विशेष त्रास सहन करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित पाणीपुरवठा लाईनची तात्काळ तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करावी व नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाकडे तातडीने लक्ष देऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी विनंतीही करण्यात आली आहे.
दरम्यान, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने याबाबत त्वरित पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
