दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -प्रताप नागरे
वाशिम
वाशिम : शहरातील शुक्रवार पेठ परिसरात जुन्या वादातून एका तरुणावर देशी बनावटीच्या पिस्टलचा धाक दाखवत लोखंडी रॉड व खंजरने प्राणघातक हल्ला केल्याच्या प्रकरणात वाशिम शहर पोलिसांनी तीन आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले असून आणखी दोन आरोपी फरार आहेत. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वाशिम शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 330/2026 अन्वये बीएनएस कलम 109, 190, 191(3), 351(2), 351(3), 352 तसेच भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3, 4, 25 अंतर्गत गुन्हा दिनांक 14 मार्च 2026 रोजी दाखल करण्यात आला होता. फिर्यादी वैभव तुकाराम बोरकर (वय 26, रा. परळकर चौक, शुक्रवार पेठ) यांच्यावर जिवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणातील आरोपी राहुल संजय ठाकरे (वय 25), सचिन कैलास कोटेकर (वय 20) व वैभव उर्फ खंजर नागोराव गुंजकर (वय 19) हे गुन्हा घडल्यानंतर फरार झाले होते. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील गिरी करीत असून त्यांना आरोपी सुरखंडी-मोहगव्हाण रोडवरील एका शेतात लपून बसल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने सापळा रचत संबंधित तिघांना ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, या गुन्ह्यातील आणखी दोन आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटक प्रक्रियेची पुढील कार्यवाही सुरू असून या घटनेचा अधिक तपास वाशिम शहर पोलीस ठाणे करीत आहे.
