दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार याठिकाणाहून निवडणूक लढवत असून निवडणूक बिनविरोध करण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे.
यासाठी सुनेत्रा पवारांनी उद्धव ठाकरे यांच्याशी दुरध्वनीवर चर्चा केली असल्याची माहिती मिळत आहे. तर काँग्रेस याठिकाणी उमेदवारांची चाचपणी करत आहे. या पार्श्वभूमीवर आता जय अजित पवार यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
बारामती येथे अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. नुकसानाची पाहणी करण्यासाठी जय पावर यांनी काही गावांचा दौरा केला. फळबागा आणि पिकांच्या नुकसानाची माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना देणार असल्याचे जय पवार यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले. अजित पवार यांनी वर्षानुवर्ष शेतकऱ्यांना ज्याप्रकारे आधार दिला, मदत केली, त्याचप्रकारे मदत करण्याचा प्रयत्न कुटुंब म्हणून मदत करू, असेही त्यांनी यावेळी म्हटले.
विरोधकांना लढायचे असल्यास त्यांनी लढावे
बारामती पोटनिवडणुकीबाबत बोलताना जय पवार म्हणाले, ज्येष्ठ नेते शरद पवारही ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. बारामतीमधील सर्व जनतेलाही ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असे वाटत आहे. ही निवडणूक होणेच दुःखाची गोष्ट आहे. काँग्रेस उमेदवार देणार असल्याची माहिती मिळत आहे. विरोधकांना ही निवडणूक लढवायची असेल तर त्यांनी लढावी, असेही ते म्हणाले.
अजित पवार हयात असताना त्यांनी लोकशाहीला प्रथम ठेवले होते. त्यांनी कधीही कुणाला निवडणूक लढण्यापासून रोखले नाहीत. आम्हीही त्यांचेच विचार घेऊन पुढे जात आहोत. बारामतीमधील लोक अजित पवारांच्या निधनानंतर खूप भावनिक आहेत. त्यामुळे विरोधकांना ही निवडणूक लढवायची असल्यास त्यांनी लढवावी, असेही जय पवार म्हणाले.
‘ती’ पत्रकार परिषदा का घेतली नाही?
अजित पवारांच्या निधनानंतर घातपाताचा संशय येत असल्यामुळे पत्रकार परिषद घेणार असल्याचे जय पवार यांनी जाहीर केले होते. मात्र त्यांनी पत्रकार परिषद घेतली नाही, याबाबत प्रश्न विचारला असता जय पवार म्हणाले की, मला जे मुद्दे मांडायचे होते, ते मुद्दे आधीच रोहित पवार यांनी मांडले आहेत. त्यामुळे मी पत्रकार परिषद घेण्याचे टाळले.
आता जोपर्यंत अंतिम अहवाल येत नाही, तोपर्यंत मी बोलणार नाही, असे ठरवले आहे. ज्यावेळी अंतिम अहवाल येईल, तेव्हा मी या विषयावर बोलेल, असेही जय पवार यांनी जाहीर केले.
