केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील ‘खोटं’ आणि ‘खरं’ गणित…
भारताला होणारा कच्चा तेल आणि एलपीजीचा (LPG) पुरवठा पेमेंटच्या समस्यांमुळे विस्कळीत झाल्याचे दावे पेट्रोलियम मंत्रालयाने फेटाळून लावले आहेत. इराणहून भारताकडे येणारा ऑईल टँकर चीनकडे वळवण्यात आल्याच्या बातम्या पूर्णपणे ‘खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या’ असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
कॅप्लर सारख्या कंपन्यांनी ‘पिंग शुन’ नावाचा टँकर गुजरातच्या वाडीनार ऐवजी चीनकडे जात असल्याचा दावा केला होता. या पार्श्वभूमीवर, मंत्रालयाने स्पष्ट केले की, आंतरराष्ट्रीय तेल व्यापारात जहाजांचा मार्ग बदलणे ही एक सामान्य प्रक्रिया असून, याचा पुरवठ्याशी संबंध जोडणे चुकीचे आहे.
पेमेंटची समस्या नाही
इराणकडून येणाऱ्या तेलासाठी कोणत्याही प्रकारची पेमेंट अडचण नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
पुरवठा साखळी सुरक्षित
भारत ४० हून अधिक देशांकडून तेल आयात करतो. रिफायनिंग कंपन्यांना त्यांच्या सोयीनुसार तेल खरेदी करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे.
‘सी बर्ड’ जहाजाचा पुरावा
एलपीजी तुटवड्याच्या अफवा थांबवण्यासाठी मंत्रालयाने सांगितले की, ४४ टीएमटी इराणी गॅस घेऊन आलेले ‘सी बर्ड’ जहाज २ एप्रिलला मंगळूर बंदरात सुखरूप पोहोचले आहे.
व्यावसायिक लवचिकता आणि बाजारातील परिस्थितीनुसार समुद्रातील जहाजे आपले गंतव्यस्थान बदलू शकतात, ही एक तांत्रिक प्रक्रिया आहे.
२०१९ मध्ये तेल आयात थांबली
२०१८ मध्ये अमेरिकेने इराणवर कडक निर्बंध लादल्यानंतर भारताने मे २०१९ पासून इराणकडून होणारी तेल आयात पूर्णपणे थांबवली. एकेकाळी भारताच्या एकूण तेल आयातीमध्ये इराणचा वाटा ११.५ टक्क्यांपर्यंत होता. २०१८ मध्ये भारत दररोज ५ लाख १८ हजार बॅरल तेल इराणकडून खरेदी करत असे, मात्र २०१९ मध्ये हे प्रमाण झपाट्याने घटून २ लाख ६८ हजार बॅरलवर आले. सध्या भारत इराणऐवजी पश्चिम आशिया, अमेरिका आणि इतर देशांकडून आपली तेलाची गरज पूर्ण करत आहे.
कॅप्लर कंपनीचा दावा
कॅप्लर या प्रसिद्ध ट्रॅकिंग कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ‘पिंग शुन’ नावाचा एक अफ्रामॅक्स टँकर सध्या चर्चेत आहे. हे जहाज ४ मार्च रोजी इराणच्या खार्ग बेटावरून सुमारे ६ लाख बॅरल तेल घेऊन निघाले आहे. विशेष म्हणजे, हे जहाज अमेरिकेच्या निर्बंधांच्या कक्षेत आहे. सुरुवातीला या जहाजाचे गंतव्यस्थान गुजरातचे वाडीनार बंदर असल्याचे सांगण्यात आले होते आणि ४ एप्रिल ही पोहोचण्याची अंदाजित वेळ होती. मात्र, आता जहाजाचे रडार गुजरातऐवजी थेट चीनमधील डोंगयिंग हे ठिकाण दाखवत आहे. कॅप्लरच्या मते, तांत्रिक यंत्रणेत नोंदवलेले ठिकाण अंतिम नसू शकते, प्रवासादरम्यान त्यात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
