दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी गंगाखेड/प्रेम सावंत
गंगाखेड:तालुक्यातील धारासुर येथील प्राचीन ऐतिहासिक राज्यसंरक्षित गुप्तेश्वर मंदिराच्या जतन, संवर्धन व जिर्णोद्धार कामांची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार गुरुवार, दि. 9 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता धारासुर येथे भेट देणार आहेत.
या दौऱ्यात त्यांच्यासोबत पुरातत्त्व विभागाचे मुख्य संचालक डॉ. तेजेश गर्गे, सहायक संचालक, आर्किटेक्ट, इंजिनिअर तसेच जिर्णोद्धार कामाचे प्रमुख राम सवानी व त्यांची टीम उपस्थित राहणार आहे. यावेळी गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचीही प्रमुख उपस्थिती असणार आहे.
मंत्र्यांच्या स्वागतासाठी धारासुर ग्रामस्थांच्या वतीने भव्यदिव्य अशी तयारी करण्यात येत असून परभणी येथील सुरभी ढोल-ताशा पथक, आकर्षक डोम मंडप, साऊंड सिस्टीम व भाविकांसाठी आसन व्यवस्था करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील हजारो भाविक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.
सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन गुप्तेश्वर मंदिर बचाव संघर्ष समितीचे सदस्य निवृत्ती कदम यांनी केले आहे.
