दैनिक चालू वार्ता रिसोड शहर प्रतिनिधी विजय जुंजारे
रिसोड : शहरात मोकाट कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मागील काही दिवसांत अनेक नागरिकांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्या असून त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी नगरसेवक बंडू वानखेडे यांनी नगर परिषद रिसोड यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी शहरातील मोकाट कुत्र्यांची तात्काळ योग्य ती व्यवस्था करावी, तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
नागरिकांच्या मते, मोकाट कुत्र्यांचे टोळके रस्त्यावर फिरत असून शाळकरी मुले, वृद्ध व्यक्ती आणि पादचारी यांना विशेषतः त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, नगर परिषद प्रशासन या समस्येवर काय उपाययोजना करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
